डेंग्यूपेक्षा मलेरियाच ‘डेंजरस’
By admin | Published: August 3, 2016 12:08 AM2016-08-03T00:08:05+5:302016-08-03T00:08:05+5:30
आकाराने लहान दिसत असलेला डास जिल्ह्यात मात्र जिवघेणा ठरत आहे. त्यातही जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया अधिक ‘डेंजरस’ दिसून येत आहे.
२५ जणांना गिळले : पाच वर्षांतील आकडेवारी, सात महिन्यांत ५३७ पॉजिटिव्ह
कपिल केकत गोंदिया
आकाराने लहान दिसत असलेला डास जिल्ह्यात मात्र जिवघेणा ठरत आहे. त्यातही जिल्ह्यात डेंग्यू पेक्षा मलेरिया अधिक ‘डेंजरस’ दिसून येत आहे. कारण मलेरियाने जिल्ह्यात मागील पाच वर्षांत २५ जणांचा जीव घेतला आहे. तर सन २०१६ च्या सात महिन्यांत (जानेवारी ते जुलै) मलेरियाचे ५३७ पॉजिटिव्ह रूग्ण मिळून आले आहेत. याही पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे मलेरियाने तालुक्यातील एका महिलेचा जीवही गेल्याची हिवताप विभागाकडे नोंद आहे.
‘साला एक मच्छर...’ हे गाणे ऐकायला जरी चांगले वाटत असले तरीही या गाण्यातील मच्छर आता साधासुधा राहिलेला नाही. भल्याभल्यांना पलंगावर खिळवून त्यातच त्याचा जीव घेणार एवढा घातक हा मच्छर ठरत आहे. यामुळेच या मच्छरपुढे आता शासनही हतबल झाले असून या मच्छरांच्या तावडीतून मुक्तता मिळावी यासाठी हिवताप व आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्यांचा नायनाट व त्यापासून बचावासाठी एक ना एक कार्यक्रम घेतले जात आहे.
मात्र काही केल्या या डासांपासून जिल्ह्याला मुक्त करविण्यात येथील हिवताप विभागाला यश आलेले नाही हेच आतापर्यंत तरी दिसून येत आहे. कारण डासांपासून होणारे आजार काही केल्या कमी होत नसल्याची आकडेवारी खुद्द हिवताप विभागाकडून प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे सन २०१५ पासून डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असतानाच मलेरिया त्याही पेक्षा वरचढ ठरत असल्याचेही दिसत आहे. कारण तेव्हा पाच जणांचा जीव मलेरियाने घेतल्याची नोंद आहे.
जिल्ह्यातील मागील पाच वर्षांची आकडेवारी बघितल्यास गांभीर्याने बघितला जात नसलेला मलेरिया खरोखरच किती घातक आहे याची प्रचिती येते. तर नावानेच धडका भरणारा डेंग्यू मात्र जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचे म्हणता येईल. ते काही असो, जिल्ह्यातील डासांचा प्रकोप मात्र मलेरियाच्या रूपातून कमी झालेला नाही. कारण याच मलेरियाने या वर्षातही एका तरूणीला गिळंकृत केल्याची नोंद विभागाकडे नोंद आहे.
नियंत्रणासाठी फवारणी सुरू
या वर्षाच्या सहा महिन्यांत (जानेवारी- जून) ३७७ रूग्ण मलेरिया पॉजिटिव्ह मिळून आले आहेत. शिवाय जुलै महिन्यात १६० मलेरिया पॉजिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे डासांवर नियंत्रणासाठी हिवताप विभागाकडून आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील ४८९ गावांची निवड करून त्यात फवारणी सुरू करण्यात आली आहे. फवारणीचा हा पहिला टप्पा संपताच दुसरा टप्पा घेऊन फवारणी केली जाणार आहे.
जिल्ह्याला २०१४ ठरले श्राप
जिल्ह्याला सन २०१४ हे वर्ष श्राप ठरल्याचे दिसून येत आहे. कारण मिळालेल्या आकडेवारीनुसार, या वर्षात मलेरियाची लागण असलेले २९ रूग्ण असून ९ जणांचा मृत्यू झाला. तर डेंग्यूची ३०४ जणांना लागण असून सात जणांचा जीव गेला. मागील पाच वर्षातील ही सर्वाधीक लागण व मृत्यूची संख्या आहे.