सुरतोली-लोहारा रस्त्यावर वाहतूक धोकादायक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:32 AM2021-08-20T04:32:49+5:302021-08-20T04:32:49+5:30
लोहारा : सुरतोली ते लोहारा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी ...
लोहारा : सुरतोली ते लोहारा रस्ता मोठ्या प्रमाणात उखडला असून मोठाले खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचून रस्त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. परिणामी या रस्त्याने वाहतूक करणे धोकादायक ठरत असून नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर अपघातांची शक्यता बळावली आहे.
सुरतोली परिसरात आणि लगतच्या ग्रामपंचायतमध्ये अनेक रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नागरिकांना खड्ड्यात रस्ता शोधत मार्गक्रमण करावे लागत आहे. खड्डे चुकवत वाहन चालवताना अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. सुरतोली-लोहारा रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. सुरतोली-लोहाराच्या मुख्य हमरस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेलगतच्या असलेल्या रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्ताच अस्तित्वात नसल्याने येथील विद्यार्थी व नागरिकांना चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे. दुसरीकडे सुरतोली ग्रामीण भागात चिखलाचे आणि खड्ड्याचे साम्राज्य पसरलेले दिसून येते. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. या मार्गावर दिशादर्शक व सूचना फलक नसल्याने तसेच जंगलभाग, वळण आणि अरुंद रस्ते असल्याने येथे अनेक छोटे-मोठे अपघात होत आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता त्वरित रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.