त्या शाळेच्या वर्ग खोल्या वापरण्यास धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:02 PM2019-03-27T22:02:41+5:302019-03-27T22:03:10+5:30
तालुक्यातील डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्यानंतर लोकमतने शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून बुधवारी (दि.२७) सकाळी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी डवकी शाळेला भेट देऊन वर्गखोल्यांची पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवरी : तालुक्यातील डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या इमारतीचे स्लॅब कोसळल्यानंतर लोकमतने शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभाराची पोलखोल केली. यामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली असून बुधवारी (दि.२७) सकाळी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी डवकी शाळेला भेट देऊन वर्गखोल्यांची पाहणी केली. तसेच या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून वापरण्यासाठी धोकादायक असल्याची सूचना मुख्याध्यापकांना दिली. तसेच शाळेच्या व्हिजिट रजिस्टरवर सुध्दा तसा शेरा मारला आहे.
डवकी येथील जि.प.केंद्रीय वरिष्ठ प्राथमिक शाळेत एकूण १ ते ७ वर्ग असून एकूण १५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेची इमारत जीर्ण झाली असून याच इमारतीत विद्यार्थ्यांना धडे दिले जात आहे. मंगळवारी (दि.२६) सकाळी ११ वाजताच्या सुमारास वर्गखोली आणि शिक्षकांच्या खोलीतील स्लॅबचे प्लास्टर कोसळून पडले. सुदैवाने त्यावेळी विद्यार्थी नसल्याने मोठी घटना टळली अन्यथा विद्यार्थी व शिक्षकांना सुद्धा इजा झाली असती. मात्र या घटनेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेचे स्लॅब टाकून दहा ते बारा वर्षे झाले असून अल्पावधीत स्लॅबचे प्लास्टर पडू लागले असून सळाखी बाहेर निघाल्या आहेत. त्यामुळे या बांधकामावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दरम्यान लोकमतने हा प्रकार लावून धरल्यानंतर बुधवारी (दि.२७) सकाळी देवरी पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी शाळेला भेट देवून वर्ग खोल्यांची पाहणी केली. तसेच ज्या वर्ग खोलीत स्लॅबचे प्लास्टर कोसळले त्या वर्गखोलीची सुध्दा पाहणी केली.
त्यानंतर त्यांनी लगेच मुख्याध्यापक एस.के.गेडाम यांना या वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्यात विद्यार्थ्यांना बसवू नये अशा सूचना केल्या. वर्ग खोल्या पूर्णपणे जीर्ण झाल्या असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही असे सांगितले. तसा शेरा सुध्दा शाळेच्या व्हिजिट बुकवर मारला.
या वेळी सरपंच उमराव बावणकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर चौधरी व सदस्य व शाळेचे शिक्षक उपस्थित होते. त्यानंतर मुख्याध्यापकांनी प्रार्थनेनंतर सर्व विद्यार्थी व शिक्षकांना वर्ग खोल्यांमध्ये बसू नये अशा सूचना दिल्या. शाळेच्या आवारातच ग्रीन नेट लावून विद्यार्थ्यांना शिक्षकांनी धडे दिले.
पालकांचा शिक्षण विभागावर रोष
शाळेच्या वर्ग खोल्या जीर्ण झाल्या असल्याची बाब शालेय व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांनी वांरवार शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र त्यांनी याची वेळीच दखल घेतली नाही. त्यामुळे मंगळवारची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. त्यामुळे या प्रकाराबद्दल पालकांनी शिक्षण विभागावर रोष व्यक्त केला.
शिक्षणाधिकारी घेणार का दखल
पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी डवकी जि.प.शाळेची इमारत जीर्ण झाली असल्याचा शेरा मारला आहे.तसेच अहवाल सुध्दा पंचायत समिती शिक्षण विभागाकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे आतातरी शिक्षणाधिकारी याची दखल घेवून जीर्ण वर्ग खोल्यांची दुरुस्ती करण्याचे निर्देश देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांची परीक्षा
सध्या मार्च महिना सुरु असून तापमानात वाढ झाली आहे. तर विद्यार्थ्यांची अद्यापही व्दितीय सत्र परीक्षा व्हायची असून पुढील महिन्यात परीक्षेला सुरूवात होणार आहे. मात्र वर्ग खोल्यात बसणे धोकादायक असल्याने विद्यार्थ्यांना तंबूत परीक्षा द्यावी लागणार आहे.
डवकीच नव्हे अनेक शाळा
डवकी येथील जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळेचे स्लॅबचे प्लॉस्टर कोसळल्याची घटना मंगळवारी घडली. यानंतर जिल्ह्यातील इतरही ठिकाणच्या जि.प.च्या जीर्ण वर्गखोल्यांचा मुद्दा पुढे आला.जवळपास १३०० वर्गखोल्या जीर्ण झाल्या असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आतातरी जि.प.शिक्षण विभाग आणि पदाधिकारी याची दखल घेऊन दुरूस्तीचे निर्देश देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.