मलेरियाच्या संसर्गाचा हॉटस्पॉट होतोय दरेकसा परिसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 05:00 AM2020-08-09T05:00:00+5:302020-08-09T05:00:23+5:30
सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. या अंतर्गत एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत तालुक्यात एकूण १७ हजार ३४० रुग्णाचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : तालुक्यातील दरेकसा परिसर आता मलेरियाचा माहेरघर ठरु लागला आहे. परंतु याच्या मुळाशी जाऊन उपाययोजना करीत मलेरियाचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभाग अपयशी ठरताना दिसत आहे.
सालेकसा तालुका जिल्ह्याच्या पूर्र्व टोकावर असून या तालुक्याला इतर दोन राज्याच्या सीमा लागून आहे. हा भाग जंगल व्याप्त असल्याने दरवर्षी या भागात मलेरियाचा उद्रेक होतो. तालुक्यात एकूण चार प्राथमिक आरोग्य केंद्रातून लोकांना आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत असतात. या अंतर्गत एप्रिल ते जुलै २०२० या कालावधीत तालुक्यात एकूण १७ हजार ३४० रुग्णाचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी एकूण ६१ नमुने मलेरिया पॉझिटिव्ह आले. यापैकी तब्बल ४८ रुग्ण एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत आढळले. उर्वरित १३ रुग्ण इतर तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडले आहेत. तालुक्यातील एकूण मलेरियाच्या रुग्णापैकी ८० टक्के रुग्ण दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळले आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय विचार केला तर मागील चार महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्र कावराबांध येथे एकूण तीन हजार ४४४ रुग्णांचे मलेरिया तपासणी करण्यात आली. त्यापैकी फक्त पाच रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह निघाले. सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन हजार १६४ लोकांचे रक्त नमुने घेण्यात आले. त्यापैकी फक्त एकच मलेरिया रुग्ण आढळला. बिजेपार प्राथमिक आरोग्य केंद्रात चार हजार २८८ लोकांचे रक्त नमुने तपासण्यात आले. त्यापैकी केवळ सात रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह आढळले. दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण सात हजार ४४४ लोकांचे रक्त नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी ४८ रुग्ण मलेरिया पॉझिटिव्ह सापडले. विशेष म्हणजे जुलै महिन्यात तब्बल ३८ मलेरिया रुग्ण दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडले आहेत. त्याहून अधिक आश्चर्य आणि चिंतेची बाब म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण सहा उपकेंद्राचा समावेश आहे.
जुलै महिन्यात सापडलेल्या ३८ मलेरिया रुग्णांपैकी दरेकसा उपकेंद्रामध्ये २६ मलेरिया रुग्ण सापडले.
उर्वरित १२ रुग्ण इतर एकूण पाच उपकेंद्रात आढळले. जानेवारी ते जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात एकूण १५० रुग्ण त्यापैकी तब्बल ५२ रुग्ण एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात सापडले. त्यातच ३२ मलेरिया रुग्ण उपकेंद्र दरेकसा येथे सापडले अर्थात ३५ टक्के मलेरिया रुग्ण एकट्या दरेकसा प्राथमिक आरोग्य केंद्रात आढळले आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात दरेकसा परिसरात दरवर्षी मलेरियाचे रुग्ण सापडत असून सुद्धा आरोग्य विभागातर्फे उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे या भागाकडे पूर्णपण दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.
मुरकुटडोह दंडारी संसर्गाचे प्रवेशद्वार
मुरकुटडोह दंडारी हे गाव मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या सीमेवर असून सीमेपलिकडे कट्टीपार, कटेमा आणि काही इतर छोटे छोटे गाव घनदाट जंगलात आहेत. त्या गावातील लोक नेहमी मुरकुटडोह दंडारी येथील आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी ये-जा करीत असतात. प्रकृती बिघडल्यास सुद्धा ते आरोग्य केंद्रात येण्यासाठी या गावांमध्ये येऊन थांबतात. त्यामुळे सुध्दा मलेरियाचा संसर्ग वाढतो.
दरेकसा उपकेंद्रात सर्वाधिक रुग्ण कसे?
प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा हे जमाकुडो परिसरात असून दरेकसा नावाचे कोणते गाव अस्तित्वात नाही. परंतु दरेकसा ग्रामपंचायत अस्तित्वात असून या ग्रामपंचायतीमध्ये डहाराटोला,बंजारी, दलदलकुही आणि मुरकुटडोह दंडारीच्या पाच गावांचा समावेश आहे. या गावांचाच समावेश दरेकसा उपकेंद्रात करण्यात आला आहे. मुरकुटडोह दंडारी परिसरात दरवर्षी मलेरिया रुग्ण आढळतात. जेव्हा येथील लोकांना अस्वस्थ वाटते तेव्हा ते दरेकसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करण्यासाठी जातात. परंतु दरेकसापासून १५ ते २० कि.मी. अंतरावर असलेल्या या गावातील लोकांना एका दिवसात पायी चालून औषधोपचारासाठी पोहोचणे शक्य नसते. अशात हे लोक मधातच दलदल कुही, धनेगाव, डहाराटोला इत्यादी गावामध्ये आपल्या नातेवाईकांकडे येऊन रात्रभर थांबतात. त्यांच्या सहवासात आल्यावर मलेरियाग्रस्त व्यक्तीला चावणारा हवाकुलीस नावाचा मादी डास इतर दुसऱ्या व्यक्तीला चावल्यावर त्या व्यक्तीलाही हिवतापाचा संसर्ग होतो. यामुळे या भागात सर्वाधिक रुग्ण आढळतात.