वर्दळ असलेल्या बाजारपेठेत धाडसी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:15 PM2018-08-18T23:15:24+5:302018-08-18T23:15:41+5:30
येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अंबिका वस्त्रालय अॅन्ड गारमेंटस्मध्ये शुक्रवारी रात्री ते शनिवारी (दि.१८) पहाटेच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुमारे साडे पाच लाख रुपयांचे कापड व रोकड लांबविल्याची घटना घडली. भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अंबिका वस्त्रालय अॅन्ड गारमेंटस्मध्ये शुक्रवारी रात्री ते शनिवारी (दि.१८) पहाटेच्या दरम्यान अज्ञात आरोपींनी सुमारे साडे पाच लाख रुपयांचे कापड व रोकड लांबविल्याची घटना घडली. भरवस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या धाडसी चोरीमुळे व्यापारी वर्गात दहशत निर्माण झाली आहे.
अर्जुनी मोरगाव येथील बाजारपेठेत अंबिका वस्त्रालय अॅन्ड गारमेंटस् नामक प्रतिष्ठान आहे. खालच्या तळठिकाणी कापडाचे दुकान व वरच्या मजल्यावर कुटुंबीय राहतात. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री कापड दुकान बंद झाले. दुकानात मान्सून हंगाम निमित्त सेल सुरु आहे. इतर वेळेपेक्षा मान्सून हंगामात कापड स्वस्त दराने मिळतात. म्हणून शुक्रवारी दुकानात बरीच गर्दी होती. दुकान बंद केल्यानंतर कुटुंबीय भोजन करुन झोपी गेले. वर्दळीच्या रस्त्यावर रात्री सामसूम असल्याची खात्री करुन अज्ञात चोरट्यांनी डाव साधला. दुकानातील शटरच्या मध्यभागी असलेला कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या गल्ल्यात अंदाजे ८२ हजार रुपयांची रोकड होती. ती चोरट्यांनी लंपास केली. एवढ्यावरच त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी दुकानातील महागड्या कपड्यांचा शोध घेतला. १ लाख ७० हजार रुपयाचे अंदाजे १०० नग जिन्स पँट, १ लाख रुपयाचे अंदाजे ८० नग टाऊजर, १ लाख २० हजार रुपये किमतीच्या अंदाजे ७० नग साड्या व ७० हजार रुपये किमतीचे अंदाजे १०० नग शर्ट व टी शर्ट लांबविले. असे एकूण ५ लाख ४२ हजार रुपये किमतीचे कापड व रोकड चोरीला गेले. पहाटे फिरायला जाणाऱ्या लोकांच्या निदर्शनास ही बाब आली. त्यांनी भ्रमणध्वनीवरुन याची माहिती कुटुंबियांना दिली. त्यांनी दुकानाच्या शटरकडे बघताच चोरी झाल्याची खात्री पटली. याची सूचना अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याला देण्यात आली.
पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांनी घटनास्थळाला भेट देवून तपास सुरू केला. नगराच्या सर्व मार्गावर शोधमोहीम राबविली. गोंदियाच्या श्वान पथक व ठसे, मुद्रा तज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानालाही दिशा गवसली नाही. ज्या ज्या ठिकाणी चोरट्यांनी स्पर्श केला असावा, अशा शंकेच्या ठिकाणच्या ठशांचे नमूने घेण्यात आले.
देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळाला भेट दिली. दिपेश प्रतापभाई जीवाणी (३८) यांच्या फिर्यादीवरुन अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात कलम ४५७, ३८० भादंविचा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. वर्दळीच्या ठिकाणी झालेला हा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याचे आवाहन अर्जुनी मोरगाव पोलिसांपुढे आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे हे करीत आहेत.