तहसील कार्यालयातच दिव्याखाली अंधार ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:33 AM2021-09-24T04:33:52+5:302021-09-24T04:33:52+5:30
देवरी : तहसील कार्यालयाचे प्रत्येक बांधकाम आणि तालुक्यातील विविध कामांवर बारीक नजर असते. असे असतानाच खुद्द तहसील ...
देवरी : तहसील कार्यालयाचे प्रत्येक बांधकाम आणि तालुक्यातील विविध कामांवर बारीक नजर असते. असे असतानाच खुद्द तहसील कार्यालयाच्या इमारतीलाच कोट्यवधी रुपये खर्च करूनही गळती लागली आहे. एकंदर तहसील कार्यालयातच निकृष्ट बांधकाम झाल्याने ‘दिव्याखाली अंधार’ म्हणण्याची वेळ नागरिकांना आली आहे.
तालुक्यात नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले. जुन्या इमारतीच्या मागे मोठ्या थाटामाटात इमारत उभारण्यात आली. कोट्यवधी रुपये खर्च करून सन २०१७ मध्ये इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. सन २०१८ मध्ये माजी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्या हस्ते या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व सोयीयुक्त ही इमारत महसूल प्रशासनाला हस्तांतरित केली. या २ वर्षांतच नवीन प्रशासकीय इमारतीच्या काही भागाला गळती लागली आहे. काही भिंतींना ओलावा सुटला असून छताचे पाणी गळू लागले आहे. इमारतीच्या मुख्य सभागृहात अक्षरश: पाणी साचून राहते. गळतीमुळे ओलावा झाल्याने या ठिकाणी आता कुठल्याही प्रकारची सभा आयोजित करण्यात येत नाही. मात्र, इतर कार्यालयीन कामांमुळे येणाऱ्या नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
-----------------------------
या प्रकाराची कसून चौकशी करा
तालुक्याची नवीन प्रशासकीय इमारत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली असून यावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र, या २ वर्षांतच इमारतीला गळती लागली असेल तर खरोखरच सार्वजनिक बांधकाम विभाग किती दर्जेदार काम करतो, हा प्रश्न नागरिकांकडून होत आहे. या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामावर ज्या अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली होती, खरोखरच बांधकामाच्या गुणवत्तेकडे त्यांनी विशेष लक्ष दिले का? जिल्हा प्रशासनाकडून याची कसून चौकशी व्हावी, तसेच अभियंता व कत्राटदाराने केलेल्या दिरंगाईमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तालुकावासी करीत आहेत.