दिरानेच जाळले वहिनीचे घर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:32 AM2021-05-25T04:32:41+5:302021-05-25T04:32:41+5:30
बिरसी-फाटा : माझ्या बापाचे घर आहे, तुम्ही येथे कसे राहता ते पाहून घेईन, तुमचा जीव घेईन अशी धमकी दिराने ...
बिरसी-फाटा : माझ्या बापाचे घर आहे, तुम्ही येथे कसे राहता ते पाहून घेईन, तुमचा जीव घेईन अशी धमकी दिराने वहिनीला दिली. काही तासांनी नेमक्या त्याच मध्यरात्री घराला आग लागली. यावरून वहिनीने दिलेल्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून दिरावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी (दि. २३) मध्यरात्री १.३० वाजता दरम्यान घडली असून सायंकाळी ७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. बसंता भीमराव नागपुरे (५०, रा. मांडवी) असे त्या पीडित वहिनीचे नाव आहे.
बसंता नागपुरे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या पतीचा मृत्यू १६ वर्षांपूर्वी झाला आहे. तेव्हापासून त्या मोलमजुरी करून कुटुंब सांभाळतात. त्यांना पाच मुली असून तीन मुलींचे लग्न झाल्याने त्या दोन मुलींसह राहतात. घरासमोरच त्यांचा दीर सुरज दुर्जन नागपुरे (४५) आपल्या कुटुंबासह राहतो. त्याला दारू पिण्याची व गावातील लोकांना शिवीगाळ करण्याची सवय आहे. शनिवारी (दि. २२) रात्री १० वाजताच्या सुमारास सुरज दुर्जन नागपुरे याने आपल्या घरातून जोरजोरात ओरडून, मी तुमचा जीव घेईन, माझ्या बापाचे घर आहे, तुम्ही कसे राहता ते मी पाहून घेईन अशी धमकी दिली. त्यावेळी बसंता आपल्या दोन्ही मुलींसह घरीच होती. त्याची अशी रोजची सवय असल्याने काही न बोलता त्या मुलींसह झोपी गेल्या.
मात्र, काही तासांनी मध्यरात्री १.३० वाजताच्या दरम्यान बसंता यांना धुराचा वास आल्याने त्यांची झोप उघडली. त्यामुळे त्यांनी घराच्या मागे जाऊन बघितले तर स्वयंपाक खोलीला आग लागल्याचे दिसून आले. आगीने जोरदार पेट घेतला होता. त्यामुळे लगेच त्यांनी दोन्ही मुलीला उठविले व घराजवळील लोकांना आवाज दिला. मोहल्ल्यातील लोक जमा झाले व त्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली. मात्र आग नेमकी कुणी लावली हे कळू शकले नाही.
घरात लागलेल्या आगीमुळे सर्व गहू, तांदूळ आदी खाद्य सामुग्री जळून भस्मसात झाली. दीर सुरज दुर्जन नागपुरे याने भांडण करून जीव घेण्याची धमकी व घरी कसे राहता हे पाहून घेण्याची धमकी दिली होती. नेमक्या त्याच रात्री काही तासांनी घराला आग लागली, त्यामुळे पोलिसांना दिलेल्या आपल्या तक्रारीत वहिनीने दिराविरुद्ध संशय व्यक्त केला आहे. बसंता भीमराव नागपुरे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम ४३६, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास तिरोडा पोलीस करीत आहेत.