गोंदिया जिल्ह्यातील अंगणवाडी पोषक आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 03:16 PM2019-07-18T15:16:25+5:302019-07-18T15:19:32+5:30
अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषक आहाराच्या पाकिटचे वाटप केले जाते. या पोषक आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची घटना गुरूवारी (दि.१८) सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे सकाळी उघडकीस आली.
गोंदिया : अंगणवाडी केंद्रातून गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना पोषक आहाराच्या पाकिटचे वाटप केले जाते. या पोषक आहाराच्या मसूरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघूळाचे पिल्लू आढळल्याची घटना गुरूवारी (दि.१८) सालेकसा तालुक्यातील बिजेपार येथे सकाळी उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार बिजेपार येथील मायरा सचिन वाघमारे या मुलीला आठ दिवसांपूर्वी स्थानिक अंगणवाडीतून सीलबंद मसूरडाळीचे पाकिट देण्यात आले. ते फोडले असता आत मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळले. या प्रकारामुळे मायराच्या कुटुंबीयांना चांगलाच धक्का बसला. त्यांनी लगेच याप्रकाराची माहिती जि.प.महिला व बालकल्याण सभापती लता दोनोडे आणि सालेकसा पंचायत समितीचे सभापती दिलीप वाघमारे यांना दिली. त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन मसुरडाळीचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाही करण्यात येईल असे सांगितले.मात्र यामुळे पुन्हा अंगणवाडीतून वितरीत केल्या जाणाºया पोषक आहारावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. पोषक आहाराच्या माध्यमातून आरोग्य सदृढ होण्याऐवजी उलट आरोग्य धोक्यात येत असल्याचे चित्र आहे. अंगणवाडीतून वितरीत करण्यात येणाºया पोषक आहाराच्या पाकिटात कधी मृत पाल तर कधी अळ्या लागलेला रवा आणि इतर साहित्य आढळल्याच्या घटना यापूर्वी सुध्दा उघडकीस आल्या आहेत. मात्र यानंतरही पोषक आहाराचे पाकीट तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नसल्याचे बिजेपार येथील घटनेनंतर स्पष्ट झाले आहे.
हा तर महिला, मुलींच्या आरोग्याशी खेळ
महिला व बालविकास विभागाद्वारे अंगणवाडीतील चिमुकले, गर्भवती महिला व किशोरवयीन मुलींचे आरोग्य सदृढ राहावे उत्तम आरोग्य राहावे यासाठी अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून पोषक आहाराचे नि:शुल्क वाटप केले जाते. मात्र त्याच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केले जात असल्याने हा तर महिला आणि मुलींच्या आरोग्याशी एकप्रकारचा खेळ असल्याचे मायराचे वडील सचिन वाघमारे यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी
अंगणवाडी केंद्रातून पुरवठा करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकीटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळले. त्यामुळे अंगणवाड्यांना पोषक आहाराचा पुरवठा करणाºया संबंधित कंत्राटदारावर कारवाही करण्याची मागणी बिजेपार येथील गावकऱ्यांनी केली आहे.
अंगणवाडी केंद्रातून वितरीत करण्यात आलेल्या मसुरडाळीच्या पाकिटात मृत वटवाघुळाचे पिल्लू आढळल्याचा प्रकार गंभीर आहे. याप्रकरणाची चौकशी करुन संबंधित कंत्राटदारावर निश्चितच कारवाही केली जाईल.
- दिलीप वाघमारे, पं.स.उपसभापती सालेकसा.