मृतदेहालाही सोसाव्या लागतात यातना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:31 PM2018-07-12T22:31:36+5:302018-07-12T22:32:12+5:30
अर्जुनी-मोरगावचा ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. वैद्यकीय अधीक्षक आहेत की नाही, याचा कार्यरत कर्मचाऱ्यांना नेमका अंदाज नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणिव ही नित्याचीच बाब झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगावचा ग्रामीण रुग्णालय विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. वैद्यकीय अधीक्षक आहेत की नाही, याचा कार्यरत कर्मचाऱ्यांना नेमका अंदाज नाही. वैद्यकीय अधिकाऱ्यांची उणिव ही नित्याचीच बाब झाली आहे. रोग्यांना ताटकळत बसावे लागते. परंतु येथे तर मृताला सुद्धा यातना भोगाव्या लागतात. ग्रामीण रुग्णालयाच्या मागे असलेला शवविच्छेदनगृह विविध समस्यांनी ग्रासलेले आहे.
ग्रामीण रुग्णालयाच्या बंदिस्त आवारात दोन खोल्यांचे शवविच्छेदनगृह आहे. त्याचा नियमित उपयोग होत नसला तरी तालुक्याच्या ठिकाणी सर्व सोयीयुक्त शवविच्छेदन गृह असणे सध्या स्थितीत आवश्यक आहे.
ज्या खोलीमध्ये मृतदेह ठेवून उत्तरीय तपासणी केली जाते तो ओटा आज शेवटची घटका मोजून रक्तरंजित झालेल्या अवस्थेत दिसत आहे. विजेची फिटींग तुटून लोंबकळत आहे. खिडक्यांचे तावदान तुटले आहे.
आतमध्ये वैद्यकीय अधिकारी करीत असलेली प्रक्रिया बाहेरील लोकांना दिसते अशी स्थिती आहे.
येथे सर्वत्र केरकचऱ्यांचा पसारा असून आरोग्य विभागाच्या कार्यक्षेत्रातच स्वच्छतेचे धिंडवडे निघाल्याचे दिसून येत आहे. बाजूच्या दर्शनी खोलीत स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. वेळीअवेळी त्या गृहामध्ये मृतकाची उत्तरीय तपासणी करावी लागते. तेथे कायमस्वरुपी विजेचा पुरवठा नसल्याने बरेचदा समस्या निर्माण होते.
मृतदेह रात्रभर सुस्थितीत ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा अभाव आहे. शवविच्छेदनगृह अखेरच्या घटका मोजण्याची वेळ आलेली दिसत आहे.
शवागारात मृतदेह ठेवल्यानंतर नातलगांना कित्येक तास उत्तरीय तपासणीची वाट पहावी लागते. विविध गैरसोयींनी युक्त असलेला शवविच्छेदनगृह समस्यामुक्त केव्हा होणार, हे कळायला मार्ग नाही. तालुक्यात घातपाताच्या, संशयास्पद व आत्महत्या यासारख्या घटना नेहमी घडत असतात.
मृतदेहांच्या उत्तरिय तपासणीसाठी येथे आणले जाते. त्यामुळे तालुका स्तरावरील शवविच्छेदन गृह सर्व सोयीयुक्त करुन तिथे कार्यशील स्वीपरची नियुक्ती करण्याची मागणी बºयाच दिवसापासूनची आहे. मात्र याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.