मृत संगीताच्या मारेकऱ्यांना अटक
By admin | Published: August 24, 2014 12:04 AM2014-08-24T00:04:46+5:302014-08-24T00:04:46+5:30
तालुक्यातील जवरी येथील नवविवाहित संगीता विजय शेंडे (२२) हिला तिच्या सासरच्या व्यक्तिंनी हुंड्यासाठी छळ करुन खून केल्याची तक्रार मृतकाचे वडील मोहनलाल हेमने यांनी पोलीस स्टेशनला
वडिलांची तक्रार : हुंड्यासाठी घेतला बळी
आमगाव : तालुक्यातील जवरी येथील नवविवाहित संगीता विजय शेंडे (२२) हिला तिच्या सासरच्या व्यक्तिंनी हुंड्यासाठी छळ करुन खून केल्याची तक्रार मृतकाचे वडील मोहनलाल हेमने यांनी पोलीस स्टेशनला दाखल करताच आरोपींना अटक करण्यात आले.
एप्रिल २०१३ मध्ये संगीताचे लग्न विजय शत्रुघ्न शेंडे (२५) सोबत झाले होते. परंतु लग्न झाल्यानंतर लगेच संगीताचा छळ सुरु झाला. पती विजय व कुटुंबियानी संगीतावर हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक अत्याचार केला. हा प्रकार संगीताने वडीलांना सांगितला होता. त्यावर त्यांनी विजय शेंडे व कुटुंबियांची समजूत घातली होती. मात्र त्याचा काहीच परिणाम झाला नाही व संगीतावरील अत्याचार सुरूच होता. एवढेच नव्हे तर सासरच्यांनी संगीताला मारण्याचा कट रचला व तिला विष देऊन ठार मारल्याची माहिती वडिलांनी पोलिसांना दिली आहे.
२० आॅगस्ट रोजी संगिताला ताप असल्याचे सांगत गोंदिया येथे दाखल केल्याची माहिती पती व सासरच्यांनी संगीताच्या वडीलांना दिली. परंतु उपचाराआधिच तिने अखेरचा श्वास घेतल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. तर मृत संगीताचा पती विजय व कुटुंबियांनी तापाने मृत्यू झाल्याची माहिती दिली. फिर्यादी मोहनलाल यांनाशेंडे कुटुंबियांवर पुर्वीच संशय होता व त्यामुळे त्यांनी मुलीवर होणाऱ्या अत्याचारामुळेच तिने आपला जीव दिल्याची माहिती पोलीसांत दिली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भादंविच्या कलम ३०४ ब, ४९८ अ, ३४ व हुंडा प्रतिबंधक कायदा ३ व ४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तर संगीताचा पती विजय शेंडे (२५) , सासरा शत्रुघ्न रामा शेंडे (५६) व सासू सरस्वता उर्फ मिराबाई शेंडे (५०,रा.जवरी) यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना २४ आॅगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
पत्नी पसंत नसल्यानेच अत्याचार
विजय शेंडे याच्या मनाविरुद्ध लग्न झाल्याची बाब येथे पुढे आली आहे. संगीता पसंत नसल्याने तो सतत ुतिला मानसीक व शारीरिक त्रास देत होता. विजयने स्वत:च्या जीवनातून तीला काढण्यासाठी हुंड्याचे पाठबळ घेतले. तर दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबध घडवून तीला स्विकारण्यासाठी पत्नीचा काटा काढण्याचा बेत समोर केला. त्यातुनच विजयने संगीताला शेतात फवारणी घालण्यात येणारे विषारी औषध दिल्याची माहिती पुढे आली. या विषारी औषणानेच तीचा मृत्यू झाला आहे असे तपासात पुढे येत आहे. पोलिसांनी आरोपीच्या घरातून शेतात फवारणीसाठी वापरण्यात येणारी विषारी औषधाची रिकामी व भरलेली बॉटल हस्तगत केली आहे.