नागपूर-रायपूर महामार्गावर पडले जीवघेणे खड्डे ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:26 AM2021-08-01T04:26:41+5:302021-08-01T04:26:41+5:30
लोहारा : शहरातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर महामार्ग क्रमांक - ५३ वर रस्त्याच्या मधोमध जागोजागी खड्डेचखड्डे पडले आहेत. परिणामी, दररोज ...
लोहारा : शहरातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर महामार्ग क्रमांक - ५३ वर रस्त्याच्या मधोमध जागोजागी खड्डेचखड्डे पडले आहेत. परिणामी, दररोज छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटनांमुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरत आहे.
देवरी शहरातून जाणाऱ्या नागपूर-रायपूर महामार्गावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे हे खड्डे वाहनधारकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. या रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीसह काही नागरिक खड्ड्यात पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मोठ्या वाहनधारकांनाही येथून वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी साचून खड्डा दिसत नसल्याने या रस्त्यावरून दुचाकीने जाणारे कुटुंबीय खड्ड्यात पडून जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. नागपूर-रायपूर महामार्गावर दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. अशात या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अनेकवेळा वाहनधारक व नागरिकांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली. परंतु, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, वाहनधारकांसह नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याकडे लक्ष देऊन खड्डे दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
...................
बस स्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत खड्डेचखड्डे
देवरी शहरातील राणी दुर्गावती चौक परिसरालाच लागून महामार्ग क्रमांक ५३ आहे. या महामार्गावरील रस्त्याच्या मधोमध अनेक खड्डे आहेत. या रस्त्यावरून भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनधारकांच्या लक्षात हे खड्डे येत नाहीत. त्यामुळे या परिसरात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. बसस्थानक परिसरातसुद्धा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
-----------------------
प्रतिक्रिया
नागपूर-रायपूर महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे होतात. संबंधित कंपनीने या महार्गाच्या कामात दिरंगाई केली आहे. विशेषत: देवरी ते शिरपूरपर्यंतच या महामार्गावर खड्डेचखड्डे आहेत.
सी.के. बिसेन (अभियंता देवरी)
---------------------------
देवरी शहरातून नागपूर-रायपूर महामार्ग गेलेला आहे. विशेषत: देवरी बसस्थानक परिसर व राणी दुर्गावती चौक परिसरातील महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेक अपघात या परिसरात झाले आहेत. याकडे कुणाचेच लक्ष नाही.
दिलीप दुरुपकर (व्यापारी, देवरी)