यंदा वेळीच मिळणार लाडक्या बहिणीची राखी; डाक विभागाची विशेष मोहीम
By कपिल केकत | Published: August 21, 2023 07:00 PM2023-08-21T19:00:04+5:302023-08-21T19:00:21+5:30
राखीसाठी आले खास पाकीट, कर्मचाऱ्यांकडून डाक पेट्यांमधून काढून आलेल्या सर्व डाकमधील राखीचे हे पाकीट मात्र वेगळे ठेवले जाणार आहे
गोंदिया - रक्षाबंधन काही दिवसांवरच आले असून, त्यासाठी बहिणींकडून आपल्या भावाला राखी पाठविण्याची धडपड सुरू झाली आहे. बहिणीच्या या प्रेमाचा मान राखत डाक विभागाने राखीसाठी खास पाकीट तयार केले आहे. एवढेच नव्हे तर लाडक्या बहिणीची राखी भावाला वेळेत मिळावी यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे. यामुळे यंदा भावाला आपल्या लाडक्या बहिणीची राखी वेळेतच मिळणार अशी अपेक्षा करता येईल.
येत्या २९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. या रक्षाबंधनाच्या पर्वावर बहीण गावखेड्यातून शहरी भागात आणि शहरातून दुसऱ्या शहरात अथवा गावी राखी पाठवितात. याकरिता डाक विभागाने विशेष पाकीट तयार केले आहे. त्यावर राखीचे आकर्षक चित्र आणि राखीचा शुभ संदेश लिहिला आहे. या पाकीटमध्ये २० ग्रॅम वजनापर्यंतची राखी बसणार आहे. विशेष म्हणजे, राखीचे पाकीट पाठविण्यासाठी स्वतंत्र वितरण व्यवस्था असणार आहे. इतर सर्व पाकिटे आणि राखीचे विशेष पाकीट यामुळे पोस्ट खात्याला ओळखता येणार आहे.
कर्मचाऱ्यांकडून डाक पेट्यांमधून काढून आलेल्या सर्व डाकमधील राखीचे हे पाकीट मात्र वेगळे ठेवले जाणार आहे. त्यानंतर लगेच त्यांना त्यांच्या गंतव्य स्थानी पोहोचते करण्यासाठी डाक विभागाची संपूर्ण यंत्रणाच कामाला लागली आहे. कित्येकदा रक्षाबंधन आटोपल्यावर भावाला बहिणीची राखी मिळते. मात्र, यंदा ही चूक होऊ नये यासाठी डाक विभागाने लगेच राखीचे पाकीट पोहोचते करण्याचा विडाच उचलला आहे.
गोंदियाला मिळाली ३०० पाकिटे
राखीसाठी डाक विभागाने तयार केलेली ३०० पाकिटे गोंदिया मुख्यालयाला मिळाली आहेत. या पाकिटात २० ग्रॅम वजनाची राखी असल्यास त्यावर ५ रुपये किमतीचे स्टॅम्प लावावे लागेल, तर २० ते ४० ग्रॅम वजनापर्यंत १० रुपयांचे स्टॅम्प लावावे लागणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी मुख्य डाक कार्यालयात विशेष काऊंटर सुरू करण्यात आले असून, तेथे फक्त राखीचे पाकीट व स्टॅम्प दिले जात आहे.
सुटीच्या दिवशीही होणार कामे
भावाच्या हाती राखी वेळीच मिळावी यासाठी डाक विभागाने संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आहे. यामध्ये आता सुटीच्या दिवशीही संपूर्ण डाक वाटप कर्मचारी कामावर राहतील, तर त्यांच्या मदतीला दोन लिपिकसुद्धा राहतील. शहरात ३०, तर जिल्ह्यात ५५० असे एकूण सुमारे ५८० डाक वाटप कर्मचारी राखीचे पाकीट वेळीच वाटप करण्यासाठी तत्पर आहेत. याबाबत त्यांना सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गोंदियाला राखीची ३०० पाकिटे मिळाली आहेत. ही पाकिटे लवकर पोहोचतील या दृष्टीने वितरण व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. वेळीच भावाच्या हाती राखी मिळावी हा आमचा प्रयत्न आहे - आशिष बंसोड, सह. अधीक्षक, गोंदिया