जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 05:00 AM2021-10-29T05:00:00+5:302021-10-29T05:00:16+5:30
मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : तालुक्यातील ग्राम मोरवाही येथील बुद्ध विहार जमीनदोस्त करणाऱ्या समाजकंटकांवर तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्या ग्रामपंचायत व जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा तसेच समता बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्तवतीने गुरुवारपासून (दि.२८) येथील जिल्हाधिकारी कार्यालायसमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
मोरवाही येथील काही कंत्राटदारांनी नवीन बुद्ध विहार बांधून देतो म्हणून सद्यस्थितीत असलेले जुने बुद्ध विहार जमीनदोस्त केले. परंतु २ वर्षे उलटूनही त्यांनी नवीन बुद्ध विहार बांधून दिले नाही. त्यामुळे येथील बौद्ध समाज बांधवांना आपले धार्मिक कार्यक्रम करता येत नव्हते. अशात बुद्ध विहार तात्काळ बांधून देण्यात यावे, दोषी कंत्राटदार तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागण्यांना घेऊन मागील ऑगस्ट महिन्यात समाज बांधवांतर्फे मोरवाही येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाला समाजकंटकांनी गालबोट लावले होते, हे विशेष.
या आंदोलनाची दखल घेत २ दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन देत जिल्हा प्रशासनाने आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु पोलीस व जिल्हा प्रशासनाने दोषींवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर भारतीय बौद्ध महासभा आमगावचे कार्यकर्ते योगेश रामटेके, मोरवाही येथील विजय मेश्राम, चंद्रशेखर मेश्राम तसेच इतर समाजबांधवांनी गुरुवारपासून (दि. २८) पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आता जिल्हा प्रशासन दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२ महिने लोटूनही कारवाई नाहीच
जिल्हा प्रशासनाने दोषींवर २ दिवसांत कारवाई करू, असे आश्वासन देत ऑगस्ट महिन्यात आंदोलन मागे घेण्यात यश मिळविले होते. परंतु आश्वासनांना २ महिने उलटले तरी, अद्याप जिल्हा प्रशासनाने दोषी व्यक्तींवर कोणतीच कारवाई केली नाही. दरम्यान, दोषी कंत्राटदार व दंगल घडविणाऱ्यांविरुद्ध पोलीस तकार नोंदविण्यात आली. आश्वासन देऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने मोरवाहीवासीयांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.