कोरोना बाधितांच्या मृत्यूचा ग्राफ वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 05:00 AM2020-10-30T05:00:00+5:302020-10-30T05:00:11+5:30
जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या दोन महिन्यातच तब्बल ९० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर ७ हजारावर रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक तर होणार नाही ना अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावल्याने दिलासा मिळाला. पण मागील सात आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा थोडी वाढ झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : सध्या सर्वत्र काेरोना बाधितांचा ग्राफ कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र कोरोना बाधित मृतकांच्या संख्येत वाढ होत आहे. जिल्ह्यात गुरूवारी (दि.२९) पुन्हा दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने मृतकांचा आकडा १२४ वर पोहचला आहे. कोरोना बाधितांच्या मृत्यूच्या ग्राफ वाढत असल्याने थोडे भीतीचे वातावरण आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कोरोना बाधितांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. या दोन महिन्यातच तब्बल ९० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला होता. तर ७ हजारावर रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा उद्रेक तर होणार नाही ना अशी चिंता जिल्हावासीयांना सतावित होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोना बाधितांचा आलेख सातत्याने खालावल्याने दिलासा मिळाला. पण मागील सात आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत पुन्हा थोडी वाढ झाली आहे. तर मृतकांच्या संख्येत सुध्दा थोडी वाढ झाली असल्याने जिल्हावासीयांना काळजी घेण्याची गरज आहे. गुरूवारी जिल्ह्यात ९५ नवीन कोरोना बाधित आढळले. यात सर्वाधिक ६१ रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहेत. गोरेगाव ३, आमगाव १५, सालेकसा २, देवरी ४, सडक अर्जुनी १, अर्जुनी मोरगाव ७ आणि बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने आतापर्यंत ३७९८० जणांच्या स्वॅब नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २८८०३ नमुने कोरोना निगेटिव्ह आले. तर ९६३४ नमुने कोरोना पॉझिटिव्ह आले.
कोरोना बाधित रुग्णांचा त्वरीत शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत आतापर्यंत ३५९४३ नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ३२३१० नमुने निगेटिव्ह तर ३६३३ नमुने पॉझिटिव्ह आले.
जिल्ह्यात आतापर्यंत ९६३४ नमुने पॉझिटिव्ह आले असून यापैकी ८६६४ जणांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत ८४५ कोरोना ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. तर ७२ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.
४०० रुग्ण गृहविलगीकरणात
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्याने घरीच गृहविलगीकरणात राहण्याची परवानगी दिली जात आहे. यातंर्गंत जिल्ह्यात सध्या ४०० रुग्ण होमआयसोलेशनमध्ये आहेत. यात गोंदिया तालुक्यात २२५, तिरोडा ५, गोरेगाव १५, आमगाव २१, सालेकसा २४, देवरी ४५, सडक अर्जुनी ६, अर्जुनी मोरगाव ५९ रुग्णांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात १४ लाख नागरिकांची तपासणी
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा जिल्ह्यात सध्या दुसरा टप्पा सुरू आहे. यातंर्गत आतापर्यंत १४ लाख २७ हजार ६२ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यात ९०० विविध आजाराचे रुग्ण आढळले.