डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू, वेळेत सिझर न केल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2021 01:06 PM2021-10-26T13:06:05+5:302021-10-26T13:15:21+5:30

गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे वेळेत सिझर न केल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि विलंब केल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

Death of a newborn due to negligence of a doctor in gondia | डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू, वेळेत सिझर न केल्याचा परिणाम

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू, वेळेत सिझर न केल्याचा परिणाम

Next
ठळक मुद्देडॉक्टरांनी वेळेत सिझर न केल्याचा परिणाम : तणावपूर्ण स्थिती

गोंदिया : अनागोंदी कारभारामुळे नेहमीच चर्चेत असणारे येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालय नवजात शिशूच्या मृत्यूमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

प्रसूतीसाठी दाखल असलेल्या महिलेचे वेळेत सिझर न केल्याने नवजात शिशूचा मृत्यू झाल्याची घटना २४ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकारानंतर महिलेल्या कुटुंबीयांनी निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याच्या मागणीला घेऊन नवजात शिशूचा मृतदेह स्वीकारला नाही. त्यामुळे सोमवारी (दि.२५) रुग्णालयात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

तालुक्यातील दासगाव येथील प्रभुदास नंदेश्वर यांनी त्यांची पत्नी प्रियमाला हिला २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता दासगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी दाखल केले होते. येथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून सिझर करावे लागेल असे सांगून गोंदिया येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयात २२ ऑक्टोबरला रेफर केले. यानंतर प्रियमालावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले.

२३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या सुमारास सिझर करण्यासाठी तिच्या पतीची स्वाक्षरी घेतली. मात्र, त्या दिवशी सिझर झाले नाही. त्यानंतर २४ ऑक्टोबरला सायंकाळी ६.४५ वाजता सिझर करण्यात आले. सिझर करण्यापूर्वी येथील डॉक्टरांनी प्रियमालाची नाॅर्मल प्रसूती होणार असे तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते. पण, सिझर झाल्यानंतर काही वेळात नवजात शिशूचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आणि सिझर करण्यास विलंब केल्यानेच आपल्या बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रभुदास नंदेश्वर यांनी केला.

नवजात शिशूच्या मृत्यूनंतर घेतलेले पैसे केले परत

सिझरनंतर नवजात शिशूचे वजन ३५०० किलो ग्रॅम होते. सिझर करण्यासाठी येथे कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी प्रभुदासकडून १ हजार रुपये घेतले होते. मात्र, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे नवजात शिशूचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी लावून धरल्यानंतर संबंधित डॉक्टरने घेतलेले पैसे नंदेश्वर यांना परत केले. याप्रकरणी नंदेश्वर यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

पैसे मागण्याच्या प्रकारात वाढ

जिल्ह्यातील एकमेव असलेल्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात प्रसूतीसाठी, तसेच उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांकडून काही डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून पैसे मागण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. शिवाय दाखल रुग्णावर वेळीच उपचार करण्यास विलंब केला जात असल्याने मागील दोन महिन्यांच्या कालावधीत ७५ नवजात शिशूंचा मृत्यू झाला आहे. तर, घडलेल्या प्रकाराबाबत आणि प्रसूतीग्रस्त महिलेच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या चौकशी समितीच्या अहवालानंतर यातील दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल, असे बाई गंगाबाई महिला रुग्णालयाचे अधीक्षक सागर सोनारे यांनी सांगितले.

बीजीडब्ल्यू रुग्णालयात महिला रुग्णांची होणारी गैरसोय आणि अनागोंदी कारभाराबाबत यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना माहिती देण्यात आली आहे. मात्र, यानंतरही कसलीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे पुन्हा एका नवजात शिशूचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी निश्चितच पाठपुरावा करणार आहे.

- सुनील मेंढे, खासदार

बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील अनागोंदी कारभाराबाबतच्या तक्रारींत वाढ झाली आहे. वारंवार सूचना केल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने कुठलीही सुधारणा केली नाही. त्यामुळे उपचारासाठी येथे येणाऱ्या गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. हा मुद्दा येत्या हिवाळी अधिवेशनात निश्चित लावून धरू.

- विनोद अग्रवाल, आमदार

Web Title: Death of a newborn due to negligence of a doctor in gondia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.