मृत्यूशी झुंज देणाऱ्या इर्री येथील ग्रामपंचायत परिचराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 11:51 AM2023-06-03T11:51:12+5:302023-06-03T11:51:34+5:30
२७ महिन्यांपासून पगार न झाल्याने केले होते विष प्राशन : संघटना म्हणते दोषींवर कारवाई करा
गोंदिया : तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत इर्री येथे परिचर म्हणून काम करणाऱ्याला मागील २७ महिन्यांपासून वेतन न दिल्यामुळे त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. यातून आलेल्या नैराश्यातून या परिचराने चक्क ग्रामपंचायतीच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ३१ मे रोजी दुपारी घडली. त्या परिचराला उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता, उपचार घेताना २ जून रोजी दुपारी ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. रमेश नान्हू ठकरेले (४८, रा. इर्री) असे आत्महत्या करणाऱ्या परिचराचे नाव आहे.
इर्री ग्रामपंचायतीने मागील २७ महिन्यांपासून ठकरेले यांना वेतन दिले नाही. ग्रामसेवक नरेश बघेले यांच्या उदासीन धोरणामुळे इर्री ग्रामपंचायत डबघाईस गेली आहे. ग्रामसेवकाने मागील २७ महिन्यांपासून परिचराला वेतन न दिल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तुटपुंजे मानधन ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्यात येते. परंतु, ते तुटपुंजे मानधनसुद्धा परिचराला दिले नाही. यामुळे संतप्त झालेल्या परिचराने विष प्राशन करून आत्महत्या केली. परिचर रमेश नान्हू ठकरेले (४८, रा. इर्री) हे आपल्या वेतनासंदर्भात जेव्हा-जेव्हा ग्रामसेवकाशी बोलत होते, तेव्हा ‘तुला जे बनते ते कर, वेतन देत नाही, कामावरून बंद करू,’ अशी धमकी देत होते. त्यामुळे तणावात आलेल्या रमेश ठकरेले यांनी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. या घटनेची नाेंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली आहे.
दोषींवर गुन्हा दाखल करा
काम करूनही परिचराला वेळेवर वेतन न देणाऱ्या ग्रामपंचायत प्रशासनावर व त्याच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या प्रत्येक घटकावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (संलग्न आयटक)ने पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. इर्री येथील ग्रामपंचायत परिचरांना मागील २७ महिन्यांचे थकीत वेतन न दिल्याने भविष्य निर्वाह निधी खात्यात नियमित रकमेचा भरणा केला नाही. वेतनाची मागणी केल्यावर कामावरून बंद करण्याची धमकी दिली. त्यामुळे आर्थिक संकटात व कर्जबाजारी झालेल्या कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली.
अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा महासंघातर्फे जिल्हाव्यापी आंदोलन करण्याचा इशारा मिलिंद गणवीर, महेंद्र कटरे, विनोद शहारे, सुनील लिल्हारे, देवेंद्र मेश्राम, भाऊलाल कटंगकार, आनंदराव बागडे, राजेश भोकासे, जगदीश ठाकरे, रहांगडाले, यशवंत दमाहे, विठ्ठल ऊके, सहेषराम माहुले, संजय चचाणे, देवेंद्र क्षीरसागर यांनी दिला आहे.