गोंदियात बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस शिपायाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 12:41 PM2018-05-30T12:41:34+5:302018-05-30T12:43:48+5:30
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी वर्धेवरुन आलेल्या पोलीस शिपायाचा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.२९) सकाळी मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी वर्धेवरुन आलेल्या पोलीस शिपायाचा येथील पोलीस मुख्यालयात मंगळवारी (दि.२९) सकाळी मृत्यू झाला. आवश्यक सुविधांअभावी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृत पोलीस शिपायाचे नाव अशोक सोनटक्के (४५) बक्कल क्र मांक ३२१ असे आहे.
प्राप्त माहितीनुसार सोनटक्के यांची गोंदिया जिल्ह्यात पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तासाठी ड्युटी लावण्यात आली होती. अर्जुनी मोरगाव येथील बुथ क्र. १०८ बोथली येथे त्यांनी कर्तव्य बजावल्यानंतर रात्री १ वाजता ते गोंदिया येथील पोलीस मुख्यालयात पोहोचले होते. कर्तव्यावर असतानाच त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती आहे. गोंदिया पोलीस मुख्यालयात पोहोचल्यावर तिथे रात्री पिण्याच्या पाण्याची सोय आणि मेस बंद असल्याने त्यांना अन्न पाण्यावाचून मैदानातच राहावे लागले. २५ तारखेला गोंदियात आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले होते. वर्धा येथील पोलिसांना घटनेनंतर साडे बारा वाजता रवानगी देण्यात आली, हे विशेष. दरम्यान, या घटनेविरु द्ध गोंदिया ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अशोकचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे.
पोलीस मुख्यालयात सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. परंतु, ज्या ठिकाणी सोनटक्के यांची ड्युटी लागली होती, त्याठिकाणी थोडीफार गैरसोय होऊ शकते. - डॉ.दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक गोंदिया.