टागोर आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2017 03:18 AM2017-01-31T03:18:53+5:302017-01-31T03:18:53+5:30
तिरोडा तालुक्यातील रावनघाटा मेंढा येथील रविंद्रनाथ टागोर आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याचा
परसवाडा : तिरोडा तालुक्यातील रावनघाटा मेंढा येथील रविंद्रनाथ टागोर आश्रमशाळेतील आठवीच्या विद्यार्थ्याचा गावाजवळच्या शेतातील विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.३०) उघडकीस आली. रविवारी शाळेला सुटी असतानाच ही घटना घडल्याचे सांगितले जाते. रविंद्र चैतराम टेकाम (१४) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रविंद्र रविवारी दुपारी आपल्या तीन मित्रांसोबत अधीक्षक, शिक्षकांची नजर चुकून खेळायला बाहेर पडले. चारही विद्यार्थी खारूताईला बघण्यासाठी ठाणेगाव शिवारात तीन कि.मी. अंतरापर्यंत गेले. मात्र इकडून तिकडे धावताना शेतातील विहीर मुलांना दिसली नाही व रविंद्र सरळ विहिरीत पडला.
विहीरीच्या सभोवताल उंच वाढलेले गवत होते. रविंद्र ओरडला. तीन मित्रांनी विहीरीच्या आजूबाजूला दोर पाहण्याचा प्रयत्न केला असता दोर दिसला नाही. यात रविंद्र पाण्यात बुडाला.
सोबतचे मित्र प्रशांत कुवरलाल मरस्कोल्हे (१४), संजोग देवेंद्र भलावी (१४), अमित राधेशाम वाढवे (१४) हे शाळेत सायंकाळी आले पण त्यांनी ही गोष्ट शिक्षकांना सांगितली नाही. रात्रीला अधीक्षक टी.एच. बावनथडे यांनी प्राचार्य आर.आर. बघेले व विद्यार्थ्याच्या वडीलांना आसलपानी येथे फोन केला असता मुलगा घरी आला नसल्याचे त्यांनी सांगितले. अधीक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांंना विचारपूस केली, पण सोबत गेलेले विद्यार्थी घाबरले असल्याने सांगण्यास तयार नव्हते. सोमवारी सकाळी ११ वाजता प्रशांत मरस्कोल्हे यांनी प्राचार्य बघेले यांना आपबिती सांगितली. त्यानंतर शोध घेतला असता तो मुलगा विहिरीत आढळला. तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यात आली. मृतक रविंद्रचे शव उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे पाठविण्यात आले. तपास पोलीस निरीक्षक संदीप कोहळी करीत आहेत.