खांबी येथील जवानांचा आजाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:16 PM2019-03-25T22:16:07+5:302019-03-25T22:16:34+5:30

देशसेवा करीत असतांना आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या खांबी (पिंपळगाव) येथील वीर सुपुत्राला सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील जनसमुदाय उपस्थित होता.

Death toll in Khambi's death | खांबी येथील जवानांचा आजाराने मृत्यू

खांबी येथील जवानांचा आजाराने मृत्यू

Next
ठळक मुद्देशासकीय इतमामात अंत्यसंस्कार : जनसमुदायाची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : देशसेवा करीत असतांना आजाराने मृत्यूमुखी पडलेल्या खांबी (पिंपळगाव) येथील वीर सुपुत्राला सोमवारी (दि.२५) सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी पंचक्रोशीतील जनसमुदाय उपस्थित होता.
खांबी येथील अतिराज बाबुराव भेंडारकर (३३) हा त्रिपुरा इस्टेट रायफल्सच्या तिसऱ्या तुकडीत कर्तव्यावर होता. कर्तव्य बजावत असतांना त्याची प्रकृती बिघडली. तो गेल्या ७ ते ८ दिवसांपासून मधूमेहाने त्रस्त होता. अचानक शनिवारी (दि.२३) पहाटे पावणे पाच वाजता दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या या तुकडीत तो एकमेव महाराष्ट्रीय होता. त्याने १३ वर्ष सैन्यदलात कर्तव्य बजावले. त्याचे मृत्यूनंतर त्याला त्रिपुरा येथून रायपूरपर्यंत विमानाने आणण्यात आले व रायपूरवरुन खांबी येथे रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. रविवारी रात्री सुमारे १०.१५ वाजताच्या दरम्यान त्याचे पार्थिव गावात येताच अत्यंत शोकमग्न वातावरण झाले.
पार्थिवासोबत अतिराजचे कुटूंबीय तसेच सैन्यदलाच्या त्याच तुकडीतील रायफलमन टूमन शाहू सोबत होते. सोमवारी सकाळी अतिराजचे पार्थिव बघण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी, नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. सकाळी ९ वाजता त्याचे राहते घरातून अंत्ययात्रा निघाली. वीर जवान अमर रहे, अशा गर्जना व देशभक्तीपर गीताच्या निनादात ही अंत्ययात्रा खांबी गावातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत स्मशानघाटावर पोहोचली.
तिथे पालकमंत्री राजकुमार बडोले, नायब तहसीलदार मुनेश्वर गेडाम, सहायक पोलीस निरीक्षक अनिल कुंभरे, अरविंद शिवणकर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. गोंदिया पोलिसांच्या वतीने हवेत तीन फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. मुलगा अंशूल व तीन भावंडानी मुखाग्नी दिला.खांबीचा वीर जवान अनंतात विलीन झाला.
या वेळी बडोले, शिवणकर, सरपंच प्रकाश शिवणकर, प्रमोद पाऊलझगडे, लायकराम भेंडारकर, नेमीचंद मेश्राम, कृष्णकांत खोटेले, सुरेंद्रकुमार ठवरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या.
मंगळवारी गावाकडे येणार होता
१९ फेब्रुवारीला अचानक वडीलांचे निधन झाले. याप्रसंगी अतिराज गावाकडे आला होता. काही दिवसांपूर्वीच तो येथून त्रिपुराला गेला. त्याची प्रकृती बिघडली. प्रकृती अस्वस्थतेनंतर घरी आराम करावे म्हणून मंगळवारी २६ मार्चला तो गावाकडे (खांबी) येणार होता. त्याचे तिकीट सुध्दा आरक्षित झाले होते. पण हे नियतीला मान्य नव्हते. अखेर त्याचा मृतदेह एक दिवसांपूर्वी गावात पोहोचला. या सर्व घटनाक्रमामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाबांच्या अंगावर लाकडे का ठेवली?
वीर जवानाची अंत्ययात्रा स्मशानघाटात पोहोचली. सरण रचले जात होते. अतिराजच्या शवावर लाकडे ठेवण्यात आली. मुखाग्नी देतेवेळी वीरपुत्राचा चिरंजीव अंशूलला आणण्यात आले. त्यावेळी बाबा...बाबा! बाबाच्या अंगावर लाकडे का ठेवली. बाबांना का बर आग लावली असा प्रश्न अंशूलने करताच अनेकांचे डोळे पाणावले, तीन वर्षाचा अंशूल के.जी.वनमध्ये शिकतो. अतिराजच्या मागे, पत्नी, वृध्द आई, तीन भावंड व मुलगा अंशूल व आप्त परिवार आहे.

Web Title: Death toll in Khambi's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.