मृतांच्या आकडेवारीत तालुका शंभरीच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:14 AM2021-01-13T05:14:35+5:302021-01-13T05:14:35+5:30
गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशात कहर करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणात का ...
गोंदिया : मागील मार्च महिन्यापासून अवघ्या देशात कहर करणाऱ्या कोरोनाने जिल्ह्यालाही आपल्या कवेत घेतले आहे. जिल्ह्यात कमी प्रमाणात का असेना मात्र आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बाधितांसह कोरोनाने जीव जाणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढत आहे. तालुका मृतांचा आकडा शंभरीच्या घरात आहे. आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक ९९ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे. यामुळे सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट असलेल्या गोंदिया तालुक्यातील धोका कायम आहे.
२५ मार्चपासून देशात लॉकडाऊन झाल्यानंतर जिल्ह्यातील पहिला रुग्ण २७ मार्च रोजी गोंदिया शहरात आढळून आला होता. त्यानंतर काही काळ सुटकेचा गेल्यानंतर झपाट्याने रुग्ण वाढ झाली व बघता-बघता आता बाधितांची संख्या १३,८९१ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८४ टक्के असल्याने आतापर्यंत १३,४५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारी (दि. ९) जिल्ह्यात २५८ रुग्ण क्रियाशील होते. ही दिलासादायक बाब असली तरी कोरोनाची दुसरी बाजू तेवढीच गंभीर आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत १७९ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही बाब जिल्हा प्रशासनासाठी गंभीर असतानाच जिल्हावासीयांसाठीही तेवढीच धक्कादायक आहे. कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यापासून गोंदिया शहर व तालुका कोरोना हॉटस्पॉट कायम आहे. परिणामी मृतांच्या आकडेवारीतही गोंदिया तालुका आघाडीवर असून आतापर्यंत ९९ रुग्णांचा जीव गेला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी प्रमाणात का असेना मात्र धोका अद्यापही टळलेला नाही.
-------
सालेकसा तालुक्यात मृत्यू दर कमी
आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व मागास तालुका म्हणून ओळख असलेल्या सालेकसा तालुक्यातील कोरोना महामारीतील कामगिरी प्रशंसनीय दिसून येत आहे. तालुक्यात ६३६ कोरोनाबाधित आढळले आले असून आजघडीला फक्त १७ क्रियाशील रुग्ण आहेत. शिवाय सर्वांत कमी फक्त ३ रुग्णांचा जीव गेला आहे. त्यानंतर सडक-अर्जुनी तालुक्यात ५ रुग्णांचा जीव गेल्याची नोंद आहे.
----------------------------
लसीनंतरही उपाययोजनांची गरज
कोरोना लस निर्माण करण्यात भारताला मोठे यश आले आहे. त्यातच आता येत्या १६ तारखेनंतर टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरुवात होत आहे. मात्र, त्यानंतरही कोरोना पूर्णपणे संपणार नसल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच लसीकरणानंतरही प्रत्येकाला तेवढेच सजग राहून उपाययोजनांचे पालन करण्याची गरज राहणार आहे.