जिल्ह्यातील ५६ हजार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2017 01:04 AM2017-06-27T01:04:26+5:302017-06-27T01:04:26+5:30
राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे.
३० जून २०१६ पर्यंतचे कर्ज माफ : दीड लाख रुपये कर्जाची मर्यादा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारतर्फे केलेल्या कर्जमुक्तीच्या घोषणेनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेंतर्गत येणाऱ्या विविध सहकारी संस्थाकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करणे बंद केले आहे. परंतु कर्जमाफीचा लाभ ३० जून २०१६ पर्यंतच कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ६२ टक्के शेतकऱ्यांनाच या कर्जमुक्तीचा फायदा होणार आहे. यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांकडून जिल्हामध्यवर्ती बँक सक्तीने वसुली करीत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके अंतर्गत येणाऱ्या विविध संस्थानी सन २००९ नंतर २ जून २०१७ पर्यंत ९१ हजार ३४६ अल्प, मध्यम व मोठ्या शेतकऱ्यांना ३२६ कोटी ५३ लाख रूपये कर्ज वाटप केले. या कर्जाचा अहवाल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शासनाला पाठविला आहे. यात ७२ हजार ४६७ अल्प व मध्यम शेतकऱ्यांनी २५४ कोटी १७ लाख रूपयाचे कर्ज घेतले. या कर्ज घेणाऱ्या २८ हजार १७१ शेतकऱ्यांनी ८४ कोटी २५ लाख रूपयाचे कर्ज भरले आहे. परंतु २४ जून रोजी सरकारने ३० जून २०१६ पर्यंतची कर्जमाफी केली आहे. यामुळे ९१ हजार ३४६ कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. २९० कोटी १७ लाख रूपये कर्ज माफ केले जाणार आहे.
सन २०१६-१७ व सन २०१७-१८ मध्ये २ जून पर्यंत ५१ हजार ५४२ मोठे, मध्यम व अल्प भूधारकांना १८३ कोटी ६४ लाख ६७ हजार रूपयाचे कर्ज विविध सहकारी संस्थांमार्फत देण्यात आले आहे. यात ४८ हजार ३३५ लघु व मध्यम शेतकऱ्यांचा समावेश आहे. लघु व मध्यम शेतकऱ्यांना १५१ कोटी ६३ लाख ९९ हजार रूपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.
३५ हजार शेतकरी राहणार वंचित
४शासनाने ३० जून २०१६ पर्यंतच्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याने गोंदिया जिल्ह्यातील ३४ हजार ७९० शेतकरी कर्जाच्या ओझ्याखालीच दबून राहतील. ९१ हजार ३४६ शेतकऱ्यांनी ३२६ कोटी ५३ लाख रूपयाचे कर्ज घेतले. परंतु ५६ हजार ५५७ शेतकऱ्यांचे २९० कोटी १७ लाख कर्ज माफ होणार आहे. ३४ हजार ७९० शेतकऱ्यांचे ३६ कोटी ३६ लाख रूपये कर्जमुक्तीच्या नियमात बसणार नाहीत. त्यामुळे ते कर्जमाफी पासून वंचीत राहणार आहेत.
राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. शेतकऱ्यांचे दीड लाख रूपयापर्यंत कर्ज माफ केले जाणार आहे. ३० जून २०१६ पर्यंतच्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे.
-व्ही.आर.वासनिक
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदिया