ठरले आता ! अग्रवाल, रहांगडाले, पुराम लढविणार भाजपचा किल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:05 PM2024-10-21T16:05:21+5:302024-10-21T16:06:03+5:30
पहिल्याच यादीत नाव जाहीर : महिनाभरापासून सुरु असलेल्या चर्चांना लागला विराम
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : भाजपने रविवारी (दि. २०) शंभर उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, आमगाव, तिरोडा या तिन्ही मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले आहेत. गोंदिया विधानसभा मतदारसंघात विनोद अग्रवाल, तिरोडा विजय रहांगडाले व आमगाव मतदारसंघातून संजय पुराम यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर अर्जुनी मोरगाव मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे राहणार असल्याने येथील उमेदवार अद्याप जाहीर व्हायचा आहे. भाजपच्या पहिल्याच यादीत तिन्ही अपेक्षित नावांचा समावेश असल्याने या मतदारसंघात भाजपकडून उमेदवारीसाठी सुरू असलेल्या नावांना आता विराम लागला आहे.
विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वांच्या नजरा प्रमुख पक्षांकडून कुणाला उमेदवारी जाहीर केली जाते याकडे लागल्या होत्या. जागा एक अन् इच्छुक अनेक, असे चित्र असल्याने व या निवडणुकीत काही चेहरे बदलले जाणार अशी चर्चा होती, तर यासाठी काही इच्छुकांनी सुद्धा तयारी चालविली होती. त्यामुळे उमेदवारांच्या यादीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. रविवारी भाजपने पहिल्या शंभर उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात तिन्ही मतदारसंघांत लावल्या जाणाऱ्या अंदाजानुसार उमेदवारांची घोषणा झाली. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून आ. विनोद अग्रवाल, तिरोडा मतदारसंघातून आ. विजय रहांगडाले, तर आमगाव मतदारसंघातून माजी आ. संजय पुराम यांना उमेदवारी जाहीर झाली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सोशल माध्यमांवर उमेदवारांचे फोटो टाकत पुन्हा गुलाल उधाळायचे, अशी टॅग लाइन दिली. तर, तिन्ही उमेदवारांनी आता फोकस विजयासाठी असणार असल्याचे सांगितले. हे तिन्ही उमेदवार २४ ऑक्टोबर उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती आहे.
आता नजर महाविकास आघाडीच्या यादीकडे
भाजपने रविवारी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील तीन मतदार- संघांतील भाजपचे उमेदवार ठरले. तर, याविरोधात आता महाविकास आघाडी कुठले तगडे उमेदवार देणार यासाठी त्यांच्या यादीकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसची यादी रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे.
गोंदियात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल सामना
भाजपने गोंदिया विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. विनोद अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर काँग्रेसने या मतदारसंघातून माजी आ. गोपालदास अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर केली असून, त्याची केवळ औप- चारिकता बाकी आहे. त्यामुळे या मतदारसंघात अग्रवाल विरुद्ध अग्रवाल, असा सामना रंगणार आहे. दोन्ही उमेदवार तगडे असल्याने या मतदारसंघातील लढत ही चुरसपूर्ण होण्याची शक्यता आहे
तिरोड्यात रहांगडाले साधणार का हॅट्रीक
तिरोडा मतदारसंघातून भाजपने सलग तिसऱ्यांदा आ. विजय रहांगडाले यांच्यावर विश्वास व्यक्त करीत उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा भाजपसाठी सुध्दा प्रतिष्ठेची आहे. या निवड- णुकीत विजय रहांगडाले हे विजयाची हॅट्रीक साधतात याकडे A संपूर्ण लक्ष असणार आहे. महाविकास आघाडी आता त्यांच्या विरुद्ध कोणता उमेदवार देणार यावर लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.
आमगाव मतदारसघात पुराम करणार का चमत्कार
आमगाव विधानसभा मतदारसंघातून भाजप माजी आ. संजय पुराम यांना पुन्हा संधी देणार, अशी चर्चा होती. त्या चर्चेला रविवारी उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर पूर्णविराम लागला आहे. भाजपने सलग तिसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली असून, ते या संधीचे सोने करून चमत्कार घडविणार काय, याकडे लक्ष असणार आहे.