जि.प.अध्यक्षपदाचा निर्णय सोमवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2022 05:00 AM2022-02-27T05:00:00+5:302022-02-27T05:00:21+5:30
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस ८, अपक्ष २ आणि चाबी पक्षाचे ४ सदस्य निवडून आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणावर सोमवारी (दि.२८) निर्णय होणार आहे. या निर्णयानंतरच जिल्हा परिषद अध्यक्षाचे आरक्षण ठरणार आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यास अध्यक्षपदासाठी नव्याने रोस्टर काढण्यात येईल. तर कायम राहिल्यास गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा निर्णय सोमवारी हाेणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आता ३६ दिवस पूर्ण झाले आहेत; पण अद्यापही जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन होऊन पदाधिकारी पदावर आरूढ झालेले नाही. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या जिल्ह्या परिषदेत सर्वाधिक २६ जागा जिंकत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. तर काँग्रेस १५, राष्ट्रवादी काँग्रेस ८, अपक्ष २ आणि चाबी पक्षाचे ४ सदस्य निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी २७ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे अपक्षांच्या मदतीने भाजप जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. तर ऐनवेळी वेगळे समीकरण झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. मात्र, सर्वांचे घोडे हे अध्यक्षपदाच्या आरक्षणाचा निर्णय न झाल्याने अडले आहे. ओबीसी आरक्षण रद्द होण्यापूर्वी जि.प. अध्यक्षपद सर्वसाधरण होते. मात्र, ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने या बदल करायचा की तेच आरक्षण ठेवायचे याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभाग घेणार आहे; पण ग्रामविकास विभागाने २८ फेब्रुवारीला ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यानंतरच निर्णय घेऊ, असे जिल्हा प्रशासनाला कळविल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अध्यक्षपदाचा निर्णय सोमवारी होणार, हे स्पष्ट झाले आहे.
ओबीसी महिला आरक्षण निघाले तर होणार जनरल
- जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर व्हायचे आहे. ते ओबीसी महिला निघाल्यास रद्द होऊन सर्वसाधारण होणार आहे. कारण यापूर्वी सलग दोन जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण हे ‘ओबीसी महिला’ निघाले आहे. त्यामुळे ते रीपीट झाल्यास रद्द होऊन सर्वसाधारण होणार आहे.
...तर भाजप राहणार सत्तेबाहेर
- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रबळ दावेदार असला जिल्ह्यात वेगळी खिचडी तयार होत असल्याची माहिती आहे. त्यानुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अपक्ष आणि चाबीचे सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी त्यांच्यात चर्चादेखील सुरू आहे. त्यामुळे हे समीकरण जुळले तर सर्वांत मोठा पक्ष असूनही भाजपला सत्तेबाहेर राहावे लागले.
भाजप सुस्त अन् महाविकास आघाडी व्यस्त
- जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याला घेऊन भाजपचे स्थानिक नेते सुस्त असल्याचे तर महाविकास आघाडीचे नेते जिल्हा परिषद निवडणुकीत आलेल्या अपयशावर मंथन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे.