गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:03 AM2017-11-03T00:03:36+5:302017-11-03T00:03:50+5:30
जिल्ह्यात यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असून शेतकरी संकटात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात यंदा कमी पाऊस आणि कीडरोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. एकंदरीत जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थिती असून शेतकरी संकटात आहे. यासर्व परिस्थितीची दखल घेत शासनाने गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून आमदार परिणय फुके यांनी केली आहे.
गोंदिया जिल्ह्याची प्रत्यक्ष पीक परिस्थिती शासन निर्णयानुसार प्राप्त निकषापेक्षा वेगळी आहे. मात्र प्रत्येक्षात ती गंभीर प्रकारात मोडते. शासनाच्या निकषानुसार गोंदिया जिल्ह्याच्या वनस्पती स्थिती निर्देशांक जरी चांगल्या वर्गवारीत येत असला तरी जिल्ह्यातील एकूण क्षेत्रापैकी ९८ टक्के क्षेत्रावर धानाची लागवड केली जाते. मात्र यंदा पावसाअभावी धानपिक धोक्यात आले आहे. शेतकºयांनी विहीरी व बोअरवेलचा वापर करुन कशी बशी पिके वाचविली. मात्र या पिकांवर विविध कीडरोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ८० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे प्रत्येक्षात शेतातील जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे त्याचा पिकांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील देवरी, गोरेगाव, गोंदिया व तिरोडा या चार तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाची दुष्काळी स्थिती आहे. पिकाला जमिनीमध्ये असलेला ओलावा १०० टक्के पेक्षा कमी होणे म्हणजेच पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता नाहीे. त्यामुळे खरीप हंगाम २०१७ पासून राज्यामध्ये दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार दुष्काळ जाहीर करण्याचे निकष व कार्यपद्धती विहित करण्यात आली आहे. सदर कार्यपद्धती व निकषानुसार तयार केलेले प्रपत्र अ व प्रपत्र ब नुसार गोंदिया जिल्ह्यातील खरीप २०१७ हंगामाला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून आ. फुके यांनी केली आहे. गोंदिया जिल्ह्यात ९८ टक्के क्षेत्रावर भात पिक घेतले जाते. भात पिकाला एकूण १२०० मी.मी. पाऊस आवश्यक आहे. भात पिकाला संपूर्ण कालावधीत पाणी आवश्यक असते. पण प्रत्येक्षात यंदा हलक्या धानाला रोवणीकरिता बराच विलंब झाला व त्यानंतर सलग पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिके संकटात आलीे आहे. देवरी, गोरेगाव, गोंदिया व तिरोडा तालुक्यांमध्ये दुष्काळी स्थिती आहे. जिल्ह्यामध्ये खरीप २०१७ मध्ये पिक परिस्थिती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात खरीप २०१७ चा हंगामात मोरगाव अर्जुनी या तालुक्यात मध्यम दुष्काळ व इतर म्हणजे गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, आमगाव, सडक अर्जुनी, देवरी व सालेकसा या तालुक्याला गंभीर दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा, अशी मागणी आ. डॉ. फुके यांनी केली आहे.