मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गुन्हेगारीत घट
By admin | Published: July 17, 2017 01:24 AM2017-07-17T01:24:51+5:302017-07-17T01:24:51+5:30
तिरोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या तिरोडा पोलीस ठाण्याची इमारत व तेथील परिसर उपेक्षित असले तरी ठाण्याला
लोकमत न्यूज नेटवर्क
काचेवानी : तिरोडा शहराच्या मध्यभागी असलेल्या तिरोडा पोलीस ठाण्याची इमारत व तेथील परिसर उपेक्षित असले तरी ठाण्याला लाभणारे पोलीस निरीक्षक हे आपल्या कर्तव्यात उत्तीर्ण होत असल्याचे दिसून येते. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गुन्हेगारीचे प्रमाण त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे घटल्याचे दिसून येते.
तिरोडा पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक संदीप कोळी लाभले तेव्हापासून शहरातच नव्हे तर ग्रामीण भागात त्यांनी आपली छाप उमटविली. वर्षभराच्या काळात कोणत्याही स्तरातून ठाणेदार संदीप कोळी यांच्या संबंधात तक्रारी असावेत, असे विधान ऐकायला मिळाले नाहीत.
पोलीस निरीक्षक कोळी जरी मृदू स्वभावाचे दिसत असले तरी दिसते तसे नसते हे विधान त्यांच्या कार्यकाळात घडलेल्या गुन्ह्यावरुन स्पष्ट होत आहे. ते तिरोडा येथील पोलीस ठाण्यात आॅगस्ट २०१६ मध्ये रुजू झाले. त्यावेळी सनासुद्दीचे दिवस, धार्मिक उत्सव, दिवाळीचे सण, शेतकऱ्यांची पाणी वाटप समस्या, ग्रामीण भागात दारु व्यवसायावर आळा घालण्याचे आव्हाने समोर असताना आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि जनतेच्या सहयोगाने ते त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्याची चर्चा शहरासह ग्रामीण भागात आहे.
पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या काळात अर्थात २०१६ या वर्षात २०१५ च्या तुलनेत घडलेल्या प्रत्येक गुन्ह्याचे प्रमाण कमी दिसून येत आहे. भाग १ ते ५ मध्ये एकूण १३८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर २०१५ मध्ये गुन्ह्यांची संख्या १८७ होती. दारुचे गुन्हे ३०३ नोंद झाले. ही संख्या २०१५ ला ३७२ एवढी होती. २०१५ मध्ये जुगाराचे गुन्हे १६ तर गतवर्षी ९ होते.
तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांच्या प्रमाणात निश्चितच घट झाली. याबाबत त्यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनात केलेल्या कार्यात कधीही यशच हाती लागते. पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे.
त्यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक, हवालदार व तंटामुक्त समित्यांचे सहकार्य मिळाल्याचे सांगितले.