जिल्ह्यात धान खरेदीत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 11:26 PM2018-01-08T23:26:46+5:302018-01-08T23:27:12+5:30
सन २०१६-१७ यावर्षाच्या तुलनेत सन २०१७-१८ या वर्षात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळात ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धानाची कमी खरेदी झालेली आहे.
आॅनलाईन लोकमत
गोंदिया : सन २०१६-१७ यावर्षाच्या तुलनेत सन २०१७-१८ या वर्षात मार्केटींग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळात ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धानाची कमी खरेदी झालेली आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत भीषण दुष्काळ असल्याची परिस्थिती आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेने ७ नोव्हेंबर २०१७ रोजी स्थायी समितीच्या सभेत तसेच ८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेत चर्चा करुन गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करा या संदर्भात ठराव घेऊन शासनाला पाठविला होता.
परंतु शासनाने गोंदिया, तिरोडा व गोरेगाव या तीन तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला. धान पिकाची कापणी झाल्यानंतर धान खरेदीसाठी शासनाकडून यंदा मार्केटीग फेडरेशनचे ५७ तर आदिवासी विकास महामंडळाचे ४१ धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले होते.
यंदा जिल्हाभरात कमी पाऊस व मावा, तुडतुड्याचा प्रकोप असल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रांवर लाखो क्विंटल धान कमी आले. सन २०१६-१७ या वर्षात मार्केटीग फेडरेशनने २ लाख ७९ हजार ३१६ क्विंटल धान्य खरेदी केले होते.
परंतु यंदा २ लाख २ हजार ९५१ क्विंटल ६५ किलो धान खरेदी केले आहे. सन २०१६-१७ या वर्षात आदिवासी विकास महामंडळाने १ लाख १ हजार ७३९ क्विंटल धान खरेदी केले होते. तर २०१७-१८ या वर्षात ८४ हजार ६३९ क्विंटल ७४ किलो धान्य खरेदी केले आहे.
सन १०१६-१७ या वर्षात मार्केटीग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने एकूण ३ लाख ८१ हजार ५५ क्विंटल धान खरेदी केले होते. मात्र सन २०१७-१८ या वर्षात मार्केटिग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने एकूण २ लाख ८७ हजार ५९१ क्विंटल ३९ किलो धान खरेदी केले आहे. म्हणजेच ९३ हजार ४६३ क्विंटल ६१ किलो धान कमी खरेदी करण्यात आले आहे.