दमदार पावसानंतरही तूट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:07 AM2019-08-10T00:07:27+5:302019-08-10T00:07:49+5:30
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरी सरासरी पावसाची तूट अद्यापही भरुन निघालेली नाही. पावसामुळे नदी नाले भरुन वाहत असून रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शुक्रवारी सकाळी देखील पावसाचा जोर कायम होता त्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पुजारीटोला धरणाचे पाणी सोडल्याने बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली होती.
जून आणि जुलै महिन्यात पावसाने पाठ दाखविल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. पावसाअभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. मात्र जुलै महिन्याच्या अखेरी आणि आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. तर मागील तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाची रिपरिप कायम आहे. त्यामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. तर पिकांना दिलासा मिळाला आहे.पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात सुध्दा वाढ झाली आहे. दरम्यान गुरूवारी पुजारीटोला धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे बाघ नदीच्या पाणी पातळी वाढ झाली होती.शुक्रवारी केवळ या धरणाचा एक दरवाजा उघडण्यात आला होता.जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३९.७९ मि.मी.पावसाची नोंद तर तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. पावसामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे. मागील वर्षी ९ आॅगस्टपर्यंत ८५ टक्के पावसाची नोंद झाली होती तर यंदा याच तारखेपर्यंत ७४ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे दमदार पावसानंतरही ११ टक्के पावसाची तूट कायम आहे. पुन्हा दोन तीन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास ही तूट भरुन निघण्याची शक्यता आहे.
न.प.शाळेला लागली गळती
शहरातील छोटा गोंदिया येथील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल या शाळेची इमारत जीर्ण झाली असून त्याची अद्यापही दुरूस्ती करण्यात आली नाही.त्यामुळे मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे छताला गळती लागली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत बसणे कठीण झाले आहे. तर शालेय पोषण आहार तयार करण्याच्या ठिकाणी सुध्दा पाणी गळत असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी न.प.मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्याकडे तक्रार केल्यानंतर त्यांनी शुक्रवारी सकाळी शाळेला भेट देऊन पाहणी केल्याची माहिती आहे.
रजेगाव पुलावरील पाणी पातळीत घट
गोंदिया-बालाघाट मार्गावरील रजेगाव येथील बाघ नदीच्या जुन्या पुलावरुन गुरुवारी एक ते दीड मिटर पाणी वाहत होते.शुक्रवारी यात घट झाली असून पुलावरुन पाणी वाहत नव्हते.मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घरांची पडझड
जिल्ह्यात मागील तीन चार दिवसांपासून पावसाची रिपरिप कायम असल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी घरे आणि गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे.महसूल विभागाने पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण करण्यास सुरूवात केली आहे.
तीन महसूल मंडळात अतिवृष्टी
शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात ३९.७९ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. तर तीन महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यामध्ये खमारी ७९ मि.मी, परसवाडा ८०.२० मि.मी., ठाणेगाव ८५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.
रोवणीच्या कामाला वेग
जिल्ह्यात पावसाअभावी रोवणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली होती.त्यामुळे मागील आठवड्यात केवळ १६ टक्के रोवण्या झाल्याची नोंद होती. तर मागील तीन चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नदी, नाले आणि शेतांमध्ये पाणी साचल्याने रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतमजुरांच्या हाताला सुध्दा काम मिळाले आहे.