कर्मचारी हस्तांतरापूर्वी आकृतीबंध निश्चित करा
By admin | Published: June 19, 2017 01:28 AM2017-06-19T01:28:28+5:302017-06-19T01:28:28+5:30
ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनाचा इशारा : कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे
लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने अधिकारी-कर्मचारी जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही कृषी अधिकारी-कर्मचारी जलसंधारणाकडे तर काही कृषी विभागाकडेच राहणार आहेत. अशात हस्तांतरापूर्वी कृषी विभागाचा आकृतीबंध निश्चित करुन प्रलंबित मागण्या मंजूर करण्याची आग्रही मागणी कृषी सहायक संघटनेने केली आहे. अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करु अशा इशारा सुध्दा कृषी सहायक संघटनेने दिला आहे.
नव्या मृद आणि जलसंधाराण विभागासाठी ३१ मे रोजी शासन आदेश जारी करण्यात आला. कृषी विभागाची अंदाजे दहा हजार पदे नव्या जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित होणार आहेत. सहायकाच्या पदोन्नतीचे महत्वाचे पद जलसंधारण विभागाने घेतले आहे. त्यामुळे नैसर्गिक न्यायाने कृषी सहायकाच्या पदोन्नतीची संधी हिरावून घेतली जात असल्याची भावना कृषी सहायक संघटनेचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
कृषी विभागात बहुतांश पदे रिक्त आहेत. त्यामुळे आकृतीबंध निश्चित झाल्याशिवाय अधिकारी कर्मचारी हस्तांतरण योग्य ठरणार नाही, अशी संघटनेची भूमिका आहे. त्यामुळे कृषी सहायक संघटनेने तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे कृषिमंत्री पाडुरंग पुंडकर यांना निवेदन पाठवून आग्रह केला की, कृषी मंत्र्यांनी कृषी विभागाच्या प्रशासकीय प्रमुखांची बैठक घ्यावी. त्यातून कृषी विभागाची पुनर्बांधणी आणि शेतकरी सेवार्थ आकृतीबंध निश्चित होईल, अशी अपेक्षा संघटनेची आहे.
कृषी सहायकाचे पदनाम सहायक कृषी अधिकारी, कृषी सेवक पदाचा तीन वर्षे कालावधी शिक्षण सेवकांप्रमाणे आश्वासित प्रगती योजनेत अंतर्भूत करणे, आंतरविभागीय बदल्यांचे प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंजूर करणे या व इतर मागण्या कृषी सहायक संघटनेच्या आहेत.
सदर मागण्यांवर विचार न झाल्यास २१ ते २४ जून दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण करण्यात येईल. १७ जून रोजी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयावर मोर्चा, १ जुलै रोजी आयुक्त कार्यालयावर मोर्चा व निदर्शने करण्यात येईल. एवढ्यावर शासनाने दुर्लक्ष केल्यास १० जुलैपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु करण्यात येईल, अशा इशारासुध्दा कृषी सहायक संघटनेने दिला आहे.
सालेकसा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डी.के. ठाकूर, राज्य कार्यकारिणी सदस्य जी.ए. चौधरी, रविशंकर भगत, जिल्हा सचिव इंद्रपाल बागडे, देवेंद्र पारधी, प्रवीण सोनी, हिवराज गजभिये, सुरेंद्र खुणे, तिर्थराज तुरकर, जे.टी. मेंढे, राखलाल भगत आदींनी तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम यांना निवेदन सादर केले.