यंत्रणेचा विलंब अन कर्मचाऱ्यांना भुर्दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 10:26 PM2018-07-12T22:26:04+5:302018-07-12T22:27:30+5:30
मागील दोन तीन महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने बँकामधून कर्जाची उचल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील दोन तीन महिन्यांपासून पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याने बँकामधून कर्जाची उचल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. उन्ह, वारा, पाऊस आणि सततच्या कर्तव्यामुळे त्रस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना यंत्रणेच्या लेटलतीफ धोरणामुळे भूर्दंड सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यांचा दर महिन्याचा पगार आॅनलाईन त्यांच्या बँक खात्यात १ ते ५ तारखेदरम्यान जमा केला जातो. मागील दोन तीन महिन्यापासून ५ तारखेपर्यंत पगार होत नसल्याने पोलीस कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नुकतीच शाळांना सुरूवात झाली असून मुलांचे प्रवेश शुल्क, शैक्षणिक साहित्याची खरेदी, किराणा, घरभाडे व इतर दैनदिन गरजांसाठी पैशाची चणचण जाणवित आहे. काही कर्मचाऱ्यांनी मुलांचे शिक्षण, घर बांधकाम व इतर खासगी कामासाठी बँकामधून कर्जाची उचल केली आहे. बँकाकडून कर्जाची रक्कम दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते. यासाठी बँकानी ५ तारेखपर्यंत कालावधी निश्चित केला आहे. या तारखेनंतर वेतन झाल्यास बँक कर्जाची उचल केलेल्या कर्मचाऱ्यांच्या ५७० रुपये पेनॉल्टी चार्जेस लावीत आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून कर्जाची उचल केलेल्या कर्मचाऱ्यांना ५७० रुपयांचा अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागत आहे. पोलीस मुख्यालयात कर्मचाऱ्यांचे पगारपत्रक तयार करण्याचे काम करणारे काही कर्मचारी सुट्टीवर असल्याने व काही तांत्रीक अडचणीमुळे पगार वेळेवर जमा करण्यास अडचण होत असल्याची माहिती आहे. मात्र चूक यंत्रणेची आणि त्याचा भुर्दंड कर्मचाऱ्यांना का असा सवाल पोलीस कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.
आठशे ते नऊशे कर्मचाऱ्यांना फटका
जवळपास आठशे ते नऊशे कर्मचाऱ्यांनी अॅक्सीस बँकेतून कर्जाची उचल केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत हमखास जमा होत असल्याने त्यांनी पगारातून कर्जाचा हप्ता कपात करण्यासाठी हीच तारीख टाकली आहे. पाच तारखेनंतर पगार झाल्यास बँक या कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५७० दंड म्हणून वसूल करीत आहे. आधीच मोजके वेतन त्यातून बँक दंड म्हणून रक्कम कपात करीत असल्याने या कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसत आहे.
घरकुलाचे स्वप्न अधुरेच
पोलीस कर्मचाऱ्यांना घर बांधकामासाठी डीजी लोन योजनेतंर्गत कर्ज दिले जाते. कर्जाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली जाते. यासाठी जिल्ह्यातील दीडशेवर कर्मचाऱ्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे अर्ज केले आहे. मात्र अद्यापही काही प्रकरणे मंजूर झाली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे घरकुलाचे स्वप्न अधूरेच असल्याचे चित्र आहे.
काही तांत्रिक अडचणीमुळे मागील दोन महिने कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर जमा झाले नाही. मात्र आता ही अडचण दूर झाली असून नियमित वेळेवर पगार जमा होईल. डीजी लोनसाठी ११० कर्मचाऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४५ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहे. तर उर्वरित कर्मचाऱ्यांच्या अर्जांमध्ये कागदपत्रे व त्रृट्या आढळल्याने ते प्रलबिंत आहेत. याची सूचना सुध्दा कर्मचाऱ्यांना दिली आहे.
- दिलीप पाटील भुजबळ, पोलीस अधीक्षक गोंदिया.