आजीबाईचा बटवा अन् कोरोना हटवा...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:28 AM2021-05-24T04:28:04+5:302021-05-24T04:28:04+5:30
गोंदिया : कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या वाढत चाललेल्या संख्येमुळे नागरिकांची भीती वाढत चालली आहे. ...
गोंदिया : कोरोना संसर्गामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाबाधित आणि मृत्यूच्या वाढत चाललेल्या संख्येमुळे नागरिकांची भीती वाढत चालली आहे. पहिली लाट गेली, सध्या दुसरी सुरू आहे आणि आता तिसरी लाट येणार आहे; त्यामुळे आता प्रत्येक जण स्वत:ला आणि कुटुंबाला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
अॅलोपॅथीसोबत आता अनेक नागरिक, कोरोनाबाधित रुग्ण पुरातन औषधपद्धतीचा उपयोग करताना दिसतात. ग्रामीण भागात आता आजीबाईच्या बटव्यातील विविध उपाय समोर येऊ लागले आहे. आजीबाईच्या बटव्यातील पदार्थही आपल्या स्वयंपाकातील आहे. त्यात हळद, लवंग, इलायची, दालचिनी, मोहरी, जिरे, मसाले पान, चुना, कात, अद्रक, सुंठ, आदींचा समावेश आहे. शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे घटक उपयुक्त ठरतात.
घसा खवखव करीत असेल तर सकाळी कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्या जातात. सर्दी झाली तर हळद व गूळ यांची गोळी घेतात. तसेच लवंग भाजून खायची; मात्र त्यावर पाणी प्यायचे नाही, हे अत्यंत उपयुक्त आहे. अद्रकाचा रस आणि मध चाटून खातात, आदी अनेक उपाय आजीबाईच्या बटव्यातील आहेत. विड्याचे पान आताही अनेक लोक खातात. त्याने पचनशक्ती चांगली राहाते हे अत्यंत उपयुक्त आहे. आयुष काढ्यातून आपल्या देशात ग्रामीण भागामुळे लोक कोरोनाशी लढा देऊ शकले. कालांतराने लोप पावलेला आजीबाईचा बटवा आता पुन्हा बाहेर काढावा लागल्याने अनेकांना आराम पडला आहे.
सध्या ढगाळ वातावरण आहे. या परिस्थितीत लोकांना सर्दी व खोकल्याचा त्रास होत आहे. घसा खवखवणे, सर्दी, कणकण वाटणे असे झाले तर ही कोरोनाची प्रारंभिक लक्षणे तर नाही ना, अशी भीती व समज झाला आहे. अशा वेळी डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी घरगुती उपाय करून पाहिले तर चांगला आराम पडू शकतो. ग्रामीण भागातील आजीच्या बटव्यात काढ्यात वापरले जाणारे हे साहित्य आताही मिळते.
....................................
- जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण- ४०१५७
- कोरोनामुक्त झालेले रुग्ण- ३८७७६
- सध्या उपचार घेत असलेले रुग्ण- ५१५
- कोरोना मृत्यू- ६६६
.................................
आजीबाईच्या बटव्यात काय?
कफ काढण्यासाठी फुटाणे खावेत
लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर एक छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा तीन कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून ३-४ वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. या काढ्यामुळे छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा जुलाबाद्वारे बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो. छातीत कफ दाटला आणि खोकला येत असेल तर मूठभर फुटाणे खावे. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात.
- मीराबाई तुकाराम हुकरे (८४ वर्षे)
........................................
हळद आहे बहुगुणी
हळद अॅण्टी-व्हायरल आणि अॅण्टी-बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते. गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजे आले छान बारीक करावे. त्यात एक कप गरम पाणी किंवा दुधात मिळवून उकळल्यानंतर हा आल्याचा चहा प्यावा. दोन चमचे मधात एक चमचा लिंबूचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दुधात मिसळून प्यावा.
-भागरथाबाई भांडारकर (वय ७२)
..............................................
रोगप्रतिकारक शक्ती वाढविते काढा
तुळसीची पाने, अश्वगंधा, लवंग, दोन वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा, चार कप पाण्यात उकळा, पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर, गूळ घाला आणि हा काढा प्याल्याने खूप फायदा होतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
-यशोदाबाई रहिले (वय ६८)
..............................................
प्रतिक्रिया
आजीबाईचा बटवा आजही कामाचा आहे. भारतीय संस्कृती ही परंपरा आहे. पहाटे गरम पाणी, रात्री दुधात हळद टाकून प्यायल्याने नियमित सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. कोरोनाकाळात त्रिकुटी काढा फार महत्त्वाचा आहे. यात काळे मिरे, लवंग, हळद, अद्रक, सुंठ, जायफळ याचा वापर करून काढा तयार करतात. आयुष काढा म्हणून अनेकांना त्यांचा लाभ झाला आहे. हळद अत्यंत उपयुक्त आहे. काळी मिरी, पिंपळी, तुळस, ज्येष्ठमध, दालचिनी, गिलोय आदी या प्राकृतिक औषधी म्हणूनही त्यात अनेक सामर्थ्य आहे. रोगप्रतिकारक शक्ती हळदीमध्ये आहे.
-डॉ. मिना वट्टी, जिल्हा आयुष अधिकारी गोंदिया. (फोटो आहे)
..................................
कशाचा काय फायदा ...
कोरोनापासून बचावासाठी
ठेचलेले अद्रक, तुळशीची पाने, व हळद ही द्र्व्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
........................................
कोरोनाच्या लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, अद्रक आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत. थंड, फ्रिजमध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
.............................
मुगाचे कढण, सूप, पाणी- मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण, सूप, पाणी प्यावे ते पोषक आहे. सुवर्ण दुग्ध- दूध-१५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे. याने कोरोनात प्रतिकारशक्ती वाढते.
...............................