घरांवरील जिवंत विद्युत तारा हटविण्यास सुरुवात ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:31 AM2021-09-27T04:31:16+5:302021-09-27T04:31:16+5:30
गोरेगाव : शहरात मागील ६ वर्षांपासून विद्युत तारा स्थानांतरणाचे काम वॉर्ड क्रमांक १३ व १५ येथे प्रलंबित होते. ...
गोरेगाव : शहरात मागील ६ वर्षांपासून विद्युत तारा स्थानांतरणाचे काम वॉर्ड क्रमांक १३ व १५ येथे प्रलंबित होते. त्यामुळे शहरवासीयांना त्रासाला तोंड द्यावे लागत होते. अनेक नागरिकांच्या घरांवरून जिवंत विद्युत तारा गेल्या असल्याने, एखाद्या वेळेस धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. मात्र आता या कामाला सुरुवात झाल्याने ही समस्या मार्गी लागली आहे.
वॉर्ड क्रमांक १३ व १४ येथील नागरिकांनी ही बाब माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्या लक्षात आणून दिली होती. त्या दिशेने आ. विजय रहांगडाले यांच्या नेतृत्वात आशिष बारेवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत हा प्रश्न लावून धरला होता. त्यामुळेच सन २०१९-२० च्या जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत वाहिनी स्थानांतरणाच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र मंजुरीनंतर कोविड १९ महामारीमुळे निधी प्रत्यक्ष स्वरूपात महावितरणला उपलब्ध होण्यास उशीर झाला होता. अलीकडेच महावितरणला निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिवंत विद्युत तारा हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. रविवारी (दि. २६) या स्थानांतरण कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.
घरावरून जाणाऱ्या विद्युत विभागाच्या जिवंत तारांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. धोका होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. माजी नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी आ. विजय रहांगडाले व माजी पालकमंत्री परिणय फुके यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मोठे यश प्राप्त झाले आहे.