मोडक्या वर्गखोल्यांपासून सुटका
By admin | Published: May 28, 2017 12:05 AM2017-05-28T00:05:10+5:302017-05-28T00:05:10+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्या मोडक्या वर्गेखोल्यामध्ये विद्यार्थ्यांने ज्ञानार्जन करु नये
१३१ नवीन वर्गखोल्या
नरेश रहिले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : स्थानिक स्वराज्य संस्थेतील अनेक वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्या मोडक्या वर्गेखोल्यामध्ये विद्यार्थ्यांने ज्ञानार्जन करु नये यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात ३३१ नविन वर्गखोल्यांचे बांधकाम तर १८१ शाळांची दुरुस्ती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्हा वार्षीक योजनेतून ५ कोटी ३१ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनेक वर्गखोल्या जिर्ण झालेल्या आहेत. त्या जीर्ण वर्गखोल्या पडून कधी विद्यार्थ्यांचा घात होईल हे सांगता येत नाही.
गोंदिया जिल्ह्यातील प्राथमिक शाळांचा १६० शाळा दुरुस्तीसाठी १ कोटी ७१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर नविन इमारत बांधकामासाठी २ कोटी ४७ लाख ५० हजार रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून प्राथमिक शाळाच्या ३०५ वर्गखोल्या नविन बांधल्या जाणार आहेत.
माध्यमिक शाळांच्या २६ नविन वर्गखोल्या बांधल्या जाणार असून २१ शाळांची विशेष दुरुस्ती केली जाणार आहे. कोणताही विद्यार्थी जिर्ण वर्गखोल्यामध्ये ज्ञानार्जन करणार नाही. यासाठी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी पुढाकार घेऊन जिल्हा वार्षीक योजनेतून सदर निधी दिला आहे. परंतु या शाळा बांधकामाचे कंत्राट मिळावे यासाठी जि.प.सदस्यांचा प्रयत्न राहणार आहे. ही कामे कुणाच्या पदरी पडतात याकडे सर्व लोकांचे लक्ष राहणार आहे.
मागील वर्षात साडे पाच कोटी खर्च
जिल्हा परिषदेच्या शाळांची जिर्ण अवस्था सुधारण्यासाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५ कोटी ५० लाख रूपये देण्यात आले होते. त्यापैकी २ कोटी रूपये प्राथमिक शाळांच्या दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आले. दीड कोटी रूपये प्राथमिक शाळांच्या वर्गखोली बांधकामासाठी खर्च करण्यात आले. तर २ कोटी रूपये हायस्कूलच्या शाळा दुरूस्ती व नविन वर्गखोल्या बांधकामासाठी खर्च करण्यात आले. अनेक वर्षापासून असलेल्या वर्गखोल्या जिर्णावस्थेत मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मागच्या वर्षी जिर्ण शाळांची संख्या मोठी होती. यंदा संख्या अत्यल्प झाली आहे.
गरजेच्या ठिकाणी वर्गखोल्या बांधा
जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्या तयार करण्यासाठी जि.प.सदस्यांची जणू चढाओढच लागते. शाळा दुरुस्तीचे किंवा बांधकामाचे कंत्राट आपल्या संबंधीत कंत्राटदाराला मिळावे यासाठी जि.प.सदस्यांचे सभापती कडे प्रयत्न केले जाते. तर काही लोक स्वत: जास्त कामे करवून घेण्यात मशगूल असतात. यामुळे जि.प.सदस्यामध्ये कामावरून हाणामारी होण्याची शक्यता असते. अशा प्रकारचा एक प्रयोग जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत घडला. या शाळा दुरुस्ती व बांधकामाच्या कारणावरून जि.प.सदस्यांमध्ये वाद होऊ नये याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. गरज असलेल्या ठिकाणी वर्गखोल्या तयार करण्यात याव्या, अन्यथा आपले वरदहस्त दाखविण्यासाठी जि.प.सदस्यांनी गरज नसलेल्या ठिकाणी वर्गखोल्या बांधकाम करु नये असाही सुर उमटत आहे.