गंगाबाईत प्रसूती करणे झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 06:00 AM2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:09+5:30
या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ.गरीमा बग्गा ह्या दोनच डॉक्टर दिवसभरापासून काम करीत होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : गर्भवतींची काळजी घेणारे गोंदियातील बाई गंगाबाई स्त्री रूग्णालय आजघडीला रूग्णांना सेवा देण्यास नाकारत आहे. आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे गंगाबाई रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. परिणामी शुक्रवारी (दि.१) २० गर्भवतींना प्रसूती करण्यास नकार देऊन घरी परत पाठविण्यात आले.
वर्षाकाठी ८ हजाराच्या घरात प्रसूती होणाऱ्या बाई गंगाबाईत आज एकही प्रसूती करू शकणार नाही असा पवित्रा शुक्रवारी येथील प्रसूती तज्ज्ञांनी घेतला आहे. आठ-आठ तासाच्या तीन शिप्टनुसार कमीत कमी २० डॉक्टर प्रसूती विभागात असायला हवे. परंतु या विभागात आधीच कमी म्हणजे फक्त आठ डॉक्टर होते. त्यापैकी सहा डॉक्टरांचा बाँड संपूनही त्यांना पुन्हा नुतनीकरणाचे आदेश देण्यात आले नाही किंवा ते यायला तयार नाही. तर त्यांच्याऐवजी पर्यायी व्यवस्था करण्यात आली नाही. प्रसूती विभागात डॉ.राजश्री पाटील व डॉ.गरीमा बग्गा ह्या दोनच डॉक्टर दिवसभरापासून काम करीत होत्या.
आठ ते दहा तास काम केल्यानंतर पुन्हा काम करणे शक्य होणार नाही म्हणून त्यांनी गर्भवतींची प्रसूती करण्यास नकार दिला. २० डॉक्टरांचे काम दोनच डॉक्टर कसे करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येणाºया तीन गर्भवती महिलांना १०८ रूग्णवाहिकेने गंगाबाईत आणण्यात आले. यावेळी दुपारी १ वाजताच्या सुमारास खमारी येथील एक गर्भवती प्रसूतीसाठी आली. परंतु ह्या चारही गर्भवतींना दाखल न करता घरी किंवा इतर आरोग्य संस्थेत जाण्यास सांगितले. यापूर्वी १६ गर्भवतींना परत पाठविण्यात आले होते.
खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या त्या गर्भवतींना दाखल करावे,यासाठी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते गंगाधर परशुरामकर यांनी तब्बल तीन तास गंगाबाईत उपस्थित राहून वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. व्ही. पी.रूखमोडे, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.भूषणकुमार रामटेके , गंगाबाईच्या अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांच्याशी चर्चा करून रूग्णांना गंगाबाईत दाखल करण्यास भाग पाडले.परंतु दाखल झालेल्या त्या गर्भवतींची देखरेख कोण करणार असा सवाल येथील उपस्थित डॉ. राजश्री पाटील यांनी उपस्थित केला. परशुरामकर यांच्या दबावापोटी तीन रूग्णांना दाखल करण्यात आले. तर एका गर्भवतीला उपचारासाठी भंडाराच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात रवाना करण्यात आले.
गंगाबाईत स्त्री रोग तज्ज्ञ नसल्यामुळे गंगाबाईत आजपासून पुन्हा प्रसूती बंद करण्यात आल्या आहेत. २० डॉक्टरांच्या कामाचा भार दोन डॉक्टरांवरच आहे.
दीड महिन्यापासून प्रमुखाचे कक्षाला कुलूप
४गंगाबाई स्त्री रूग्णालयातील प्रसूती कक्षाचे प्रमुख डॉ. देशमुख आहेत. परंतु मागील दीड महिन्यापासून ते सुट्टीवर असल्याने त्यांनी कक्षाला कुलूप लावून ठेवले आहे. त्यांचा प्रभार डॉ. राजश्री पाटील यांच्याकडे देण्यात आला परंतु कक्षाला कुलूप असल्यामुळे त्यांना पत्रव्यवहार करतांना हाताने पत्र लिहावे लागत आहे. महिनाभरापासून डॉक्टरांची मागणी करूनही वैद्यकीय अधिष्ठाता यांनी डॉक्टर उपलब्ध करून दिले नाही, अशी खंत व्यक्त केली.
तीन महिन्यांपासून पाठपुरावा
४गंगाबाईत ही परिस्थिती येणार यासाठी गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी मागील तीन महिन्यापासून जिल्हा शल्यचिकीत्सक व वैद्यकीय अधिष्ठाता यांना पत्र लिहीले. काही डॉक्टरांचे करार संपणार होते. काहींनी महिनाभरापूर्वी राजीनामा लिहून दिला होता.परंतु याकडे वैद्यकीय अधिष्ठाता यांनी सपशेल दुर्लक्ष केल्यामुळे आज घडीला गंगाबाईत प्रसूती होणे बंद झाले आहे.
परशुरामकर टाकणार जनहित याचिका
४गंगाबाईत गोरगरिबांचा उपचार होत नाही. ग्रामीण भागातील गर्भवतींना रेफर टू, नागपूर, भंडारा केले जात असल्याने ह्या संदर्भात जि.प. सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात लवकरच जनहित याचिका टाकणार असल्याचे सांगितले. गोंदियातील संपूर्ण आरोग्य यंत्रणाच आजारी असल्याची तक्रार केली जाणार आहे.
उद्भवू शकतो कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न
४गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे आंतर रूग्ण व बाह्य रूग्ण तपासणी होत नाही. त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उदभवू शकतो. त्यासाठी त्वरीत प्रसूती तज्ज्ञ उपलब्ध करून द्यावे, असे डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी वैद्यकीय अधिष्ठाता यांना १ नोव्हेंबर रोजी पत्र लिहीले आहे.