डेल्टाची खबरदारी.... ३०० नागरिकांचे घेतले स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:34 AM2021-08-14T04:34:28+5:302021-08-14T04:34:28+5:30
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून केवळ १ रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह आहे; मात्र बुधवारी जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील एक ...
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून केवळ १ रुग्ण कोरोना ॲक्टिव्ह आहे; मात्र बुधवारी जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील एक आणि सालेकसा तालुक्यातील एक अशा दोन रुग्णांचे नमुने डेल्टा पॉझिटिव्ह आढळले. ते दोन्ही रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत; मात्र या कालावधीत त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब नमुने खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाच्या चमूने घेतले. सालेकसा तालुक्यातील रुग्ण आढळलेल्या गावातील ४७ तर सडक अर्जुनी तालुक्यातील २६३ नागरिकांचे स्वॅब नमुने घेऊन ते गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. यात काही नमुने कोरोना बाधित आढळल्यास त्यांचे नमुने पुणे येथील सीएसआयआर आयजीआयबी प्रयोगशाळेकडे डेल्टा प्लसच्या अनुषंगाने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तूर्तास तरी या दोन्ही गावांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आहे. विशेष म्हणजे या दोन्ही रुग्णांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली नव्हती. दरम्यान, या दोन्ही रुग्णांना गुरुवारी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आल्याची माहिती आहे. डेल्टा प्लसचा जिल्ह्यात एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरु केल्या आहेत.
.......
सहजपणे घेऊ नका ..
जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे असले तरी आरोग्य विभागाने ही सहज घेऊ नये, रुग्ण आढळलेल्या गावातील नागरिकांचे स्वॅब नमुने घेणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, सर्वेक्षण करणे, डेल्टा प्लसच्या अनुषंगाने नियमित स्वॅब नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणे, साथरोग नियंत्रण अधिकारी, स्वॅब नमुने तपासणी प्रयोगशाळेचे तज्ज्ञ या सर्वांनी बारकाईने लक्ष ठेवावे अशा सूचना मुंबई येथील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी व्हिडिओ काॅन्फरन्समध्ये जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला दिल्याची माहिती आहे.