पाण्याच्या निकासीसाठी नाली बांधकामाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:24 AM2021-07-25T04:24:20+5:302021-07-25T04:24:20+5:30
बाराभाटी : लागून असलेल्या ग्राम कुंभीटोला येथे अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा राज्यमार्गाच्या कडेला राहत असलेले रामदास मोडकू राऊत यांच्या ...
बाराभाटी : लागून असलेल्या ग्राम कुंभीटोला येथे अर्जुनी- मोरगाव ते कोहमारा राज्यमार्गाच्या कडेला राहत असलेले रामदास मोडकू राऊत यांच्या घरातील अंगणात पावसाचे पाणी साचून राहत असून घरातही शिरते. यामुळे राऊत यांनी ग्रामपंचायतसह लोकप्रतिनिधींनाही नाली बांधकामाची मागणी केली. मात्र त्याचा काहीच लाभ झालेला नाही.
राज्यमार्ग आणि गावातील रस्ता यांच्या संगमाच्या कोपऱ्यात राऊत यांचे घर आहे. रस्ते उंच असल्यामुळे पावसाचे पाणी त्यांच्या घरातील अंगणात साचून घराते. शिवाय निकासीसाठी नाली नसल्यामुळे कित्येकदा पाणी त्यांच्या घरात शिरते. अशात घर ओल धरून एखाद्यावेळी कोसळून पडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तसेच पाणी साचून राहिल्याने घरातील अंगणात चिखल होत असून कधी कुणी पडून काही अनुचित प्रकार घडण्याचीही शक्यता आहे.
यामुळे राऊत यांनी ग्रामपंचायत कार्यालय, तहसीलदार, बांधकाम विभाग व आमदारांना अर्ज देत नाली बांधकामाची मागणी केली. मात्र त्यांच्या अर्जाकडे कुणाचेही लक्ष गेल्याचे दिसत नाही. कारण अद्याप कुणीही त्यांच्या अर्जावर दखल घेतलेली नाही. अशात तालुका प्रशासन किती तत्परतेने सर्वसामान्यांच्या पाठीशी उभा आहे हे दिसून येते. शिवाय, मतांसाठी दारावर येणारे जनप्रतिनिधी निवडणूक आटोपल्यावर मतदारांना कसे विसरतात याचीही प्रचिती राऊत यांच्या प्रकरणातून येते.