जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच डिमांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:27 AM2021-05-22T04:27:13+5:302021-05-22T04:27:13+5:30
गोंदिया : कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाचा आता जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिसत आहे. यासाठी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात केंद्र वाढवून लसीकरण ...
गोंदिया : कोरोनाला थोपविण्यासाठी शासनाचा आता जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरणावर जोर दिसत आहे. यासाठी जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात केंद्र वाढवून लसीकरण केले जात आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोनच लसी दिल्या जात आहेत. यातही कोविशिल्ड लसीलाच नागरिकांची डिमांड दिसत असून, आतापर्यंत १,४३,१५१ नागरिकांनी कोविशिल्ड लसीचेच डोस घेतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २,१६,०२५ नागरिकांनी लस घेतली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी भारतातच तयार करण्यात आलेल्या कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या लसींचे शस्त्र हाती आले आहे. मात्र, लसीकरणाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे नसल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला. आता पुढे कोरोना आपले पाय पसरू नये, यासाठी जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करणे हाच एकमेव उपाय असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्या दृष्टीने शासन लसीकरणावर जोर देत असून, जास्तीतजास्त नागरिकांच्या लसीकरण करणे हेच मुख्य उद्दिष्ट आहे. त्यानुसार, आता जिल्ह्यातही लसीकरणासाठी व्यापक मोहीम छेडण्यात आली असून, लसीकरण केंद्रांची वाढ व जनजागृती केली जात आहे.
त्यानुसार, आता लसीकरणाला घेऊन नागरिकांच्या मनातील भीती व शंकाही कमी झाल्या असून, ते लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसत आहे. मात्र, खास बाब अशी की, जिल्ह्यात कोविशिल्ड लसीलाच नागरिकांची जास्त पसंती दिसत आहे. जिल्ह्यातील लसीकरणाची बुधवारपर्यंतची आकडेवारी बघितल्यास २,१६,०२५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये १,४३,१५१ नागरिकांनी कोविशिल्ड हीच लस घेतली असल्याचे दिसत आहे, तर ७२,८७४ नागरिकांनी कोव्हॅक्सिनची लस घेतली आहे.
--------------------------------------
१.६८ लाख नागरिकांनी घेतला पहिला डोस
जिल्ह्यात कोरोनाशी लढण्यासाठी लसीकरणावर जोर दिला जात असतानाच, आता नागरिकांनाही लसीचे फायदे दिसून येत असल्याने तेही लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. असे असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत १,६८,०२८ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर ४७,९९७ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लस अत्यंत सुरक्षित असल्याने नागरिकांनी लस घ्यावी, यासाठी शासन प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.
-------------------------------------
१८ - ४४ वर्गालाही लस द्या
मध्यंतरी १८ वर्षांपासून पुढे वर्गासाठी लसीकरण सुरू करण्यात आले होते. मात्र, काही दिवसांतच या वर्गाचे लसीकरण थांबविण्यात आले. विशेष म्हणजे, १८ ते ४४ या वर्गांतील तरुण व युवा कामानिमित्त घराबाहेर पडत असल्याने, त्यांनाही सुरक्षा कवचाची अधिक गरज आहे. करिता आता १८ ते ४४ वर्गांचे लसीकरण सुरू करावे, अशी मागणीही जोर धरत आहे.