उष्णा तांदळासाठी वाढली छत्तीसगडमध्ये धानाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 02:53 PM2024-09-19T14:53:46+5:302024-09-19T14:55:36+5:30
ताब्यात घेतलेल्या धानाची चौकशी सुरू: महाराष्ट्रातून जातोय मोठ्या प्रमाणात धान
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : चार दिवसांपूर्वी देवरी पोलिसांनी देवरी-रायपूर मार्गावरील शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर छत्तीसगड राज्यात जाणारे पाच ट्रक धान ताब्यात घेतले होते. हे धान जिल्ह्यातील सडक अर्जुनी आणि नवेगावबांध येथील व्यापाऱ्यांचे असल्याचे चौकशीत पुढे आले आहे. छत्तीसगड राज्यात उष्णा तांदळासाठी धानाची मोठ्या प्रमाणात मागणी असून, त्यासाठी महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात धान खरेदी करून छत्तीसगडमध्ये पाठविला जात असल्याची माहिती पुढे आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेतले जाते. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमीभावाने धान खरेदी केली जाते. मात्र, तीन-चार वर्षांपूर्वी शासकीय धान खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या धानाची काही केंद्र चालकांनी अतिरिक्त दराने छत्तीसगड राज्यात विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. १४ सप्टेंबर रोजी देवरी पोलिसांनी शिरपूरबांध येथील सीमा तपासणी नाक्यावर पाच ट्रक धान ताब्यात घेतले होते. हा धान छत्तीसगड राज्यात जात असल्याचे ट्रकचालकांनी पोलिसांना सांगितले. मात्र, त्यांच्याकडे यासंबंधी काही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी हे ट्रक ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.
देवरीचे उपविभागीय अधिकारी विवेक पाटील यांनी या धानाची अधिक चौकशी करण्यासाठी व हे शासकीय धान तर नाही ना याची खात्री पटविण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला पत्र दिले होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने पडताळणी करून हे शासकीय धान खरेदी केंद्रावरील नसल्याचे पत्र पोलिस विभागाला दिले असल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अधिकारी विवेक इंगळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
धान खरेदी बिल, शेष भरल्याची पावती अनिवार्य
धानाची खरेदी-विक्री कुठेही करता येते यासाठी कसलेच निर्बंध नाही; पण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी अथवा दुसऱ्या राज्यात धान पाठविताना त्याचे खरेदी बिल, संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेष भरल्याची पावती तसेच वाहतुकीसाठी लागणारी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. मात्र, देवरी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकांकडे ही कागदपत्रे तेव्हा नसल्याची माहिती आहे.
चिचोला बॉर्डरवर सुरु झाले उष्णा प्लांट
महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या चिचोला बॉर्डरवर तीन-चार उष्णा तांदळाचे मोठे प्लांट सुरू झाले आहे. या प्लांटला सध्या उष्णा तांदळासाठी मोठ्या प्रमाणात धानाची गरज आहे. त्यामुळे महा- राष्ट्रातून २४०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दराने धानाची छत्तीसगड राज्यात विक्री केली जात आहे. पूर्व विदर्भातून दररोज ५० ते ६० ट्रक धान चिचोला येथे जात असल्याची माहिती आहे.