इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, गुळवेलला मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:29 AM2021-05-10T04:29:00+5:302021-05-10T04:29:00+5:30

गोंदिया: संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली ...

Demand for Immunity Booster | इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, गुळवेलला मागणी

इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, गुळवेलला मागणी

Next

गोंदिया: संपूर्ण जगात कोरोनाने प्रचंड थैमान घातले आहे. राज्यात दुसरी कोरोनाची लाट आल्याने कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकजण आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी घरच्या घरी आयुर्वेदिक औषधे, परिसरातील विविध औषधी वनस्पतींचा काढा, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत आहेत. त्यामुळे आता आपल्याच परिसरात उपलब्ध असणाऱ्या वनौषधींचे महत्त्व कोरोनामुळे वाढत आहे. यामध्ये विशेषकरून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गुळवेल, पुदिना, गवती चहा, कोरफड, शतावरी, कडुनिंब, पिंपळ या वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत आहे. परिसरात सर्वत्र आढळून येणाऱ्या कडुनिंबासह गवती चहाचा आज मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. विविध रोपवाटिकांमध्ये या रोपांच्या मागणीतही वाढ झाली आहे. कडुनिंबाच्या पानाचा, सालीचा काढा तसेच पानांचा ज्यूस काढून तसेच चहामध्ये अद्रक, गवती चहासारख्या वनस्पतींचा वापर करीत आहेत. एकंदरीत नैसर्गिक वनसंपत्तीने विपुल असलेल्या गोंदिया जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधे घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे.

..........................................................

सध्या कोरोना वाढला असल्याने नागरिकांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची गरज आहे. ज्यांना औषधी वनस्पतींची जाण आहे, ते लोक कडुनिंब, गवती चहा, गुळवेल, वड, पिंपळ अशा रोपांची आमच्याकडे मागणी करीत आहेत. औषधी वनस्पतींमध्ये मोठी ताकद आहे. ज्या जाणकारांना हे माहीत आहे ते लोक खरेदीसाठी येत आहेत. घरी आम्ही काढाच वापरत आहोत.

- बिसेन, नर्सरी मालक राधाकृष्ण वॉर्ड रिसामा, आमगाव.

.............

आमच्या भवभूती महाविद्यालयातील वनस्पती उद्यानात इम्युनिटी वाढविणाऱ्या तुळस, गुळवेल, शतावरी, मेंथा, बच्चनाग (वेखंड), लेंडीपिपळी, गुगूळ, भुईनिंब, जपानी सांबर, गुलबकावळी, तुळस, मुसळी अशी विविध वनस्पती लावली आहेत. या वनस्पतीपासून इम्युनिटी वाढविण्यास खूप मदत होते.

- डॉ. श्रीराम भुस्कुटे

वनस्पतीशास्त्र तज्ज्ञ तथा प्राचार्य भवभूती महाविद्यालय आमगाव.

...............................................................................................................

या रोपांना कोरोनामुळे आहे प्रचंड मागणी

तुळस : ही एक सर्वत्र आढळणारी बहुगुणी औषधी वनस्पती आहे. त्यामुळेच आजही प्रत्येकाच्या दारासमोर तुळस लावण्यात येते. तुळशीचा महत्त्वाचा फायदा खोकला, विषदोष, दमा, उचकी लागणे, खवखव होणे तसेच मळमळ होत असल्यास तुळशीच्या पानांचा वापर उपयुक्त ठरतो. तसेच छातीमध्ये जळजळ, वातदोषाचे शमन करण्यासह तुळस दुर्गंधीचा नाश करते. तसेच तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचा महत्त्वाचा गुणधर्मही आहे.

....

अद्रक (आले) : आज घरोघरी प्रत्येकजण चहामध्ये आवर्जून अद्रकचा म्हणजेच आल्याचा वापर करत आहेत. अद्रकमध्ये ॲन्टिफंगल, ॲन्टिसेप्टिक, बायोटिक व्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याबरोबरच विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेदेखील असल्याने आपल्या स्वास्थ्यासाठी कोरोनाकाळात अद्रक महत्त्वाची व मोलाची भूमिका निभावत असल्याने आज आल्याची प्रचंड मागणी बाजारात वाढली आहे. सध्या अद्रकचे दर हे कमी झाले आहेत.

अडुळसा : अडुळसा ही आपल्या परिसरातील एक औषधी वनस्पती आहे. त्याची पाने उगाळून घेतल्यास त्यापासून जो रस तयार होतो, तो रस काढ्याच्या स्वरूपात घेतल्यास शरीरात अंतर्गत रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शरीरासाठी ही वनस्पती अत्यंत उपयुक्त असून त्याच्या रोपांची मागणीही सध्या वाढली असल्याचे दिसून येत आहे.

गुळवेल : गुळवेल या रोपाला अमृता असेही अनेक ठिकाणी संबोधले जाते. अस्थमा व श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीला गुळवेल या रोपाचा प्रचंड फायदा होतो. गुळवेल या रोपाच्या काढ्याचा रस काढला जातो आणि तो काढ्याच्या स्वरूपात प्राशन करण्यास दिला जातो. याचा मानवी आरोग्याला चांगला फायदा होतो.

अश्वगंधा : अश्वगंधामध्ये ॲन्टिऑक्सिडंट आणि ॲन्टिइन्फ्लेमेंटरीचे महत्त्वाचे गुण असतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्येपासून सुटका होते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी आणखीन मजबूत होतात. त्यासोबतच कोलेस्टेरॉलचा खराब स्तरही कमी होऊन आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Web Title: Demand for Immunity Booster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.