जंगलात कृत्रिम पाणवठ्याची संख्या वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:53 AM2021-03-13T04:53:27+5:302021-03-13T04:53:27+5:30
केशोरी : पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यप्राण्यांचा परिसरातील गावात शिरकाव वाढला आहे. पाण्यासाठी प्राण्यांचा गावात शिरकाव थांबविण्यासाठी गोठणगाव व परिसरातील ...
केशोरी : पाण्याच्या शोधात जंगलातील वन्यप्राण्यांचा परिसरातील गावात शिरकाव वाढला आहे. पाण्यासाठी प्राण्यांचा गावात शिरकाव थांबविण्यासाठी गोठणगाव व परिसरातील जंगलात कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व गोठणगाव परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबटसारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर वाढला आहे. यातूनच मानवांवर हल्ला करून कित्येकांना ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठार केल्याच्याही कित्येक घटना घडल्या आहेत. अनेकांना परिसरात प्रत्यक्षरित्या बिबट्याच्या पाऊलखुणा आढळून आल्यामुळे नागरिक धास्तावले आहेत. वनविभागातील अधिकारी-कर्मचारी सतत लक्ष ठेवून असले तरीही मानवावर वन्यप्राण्यांकडून हल्ला करणे सुरूच आहे.
विशेष म्हणजे, आता उन्हाळा सुरू झाला असून जंगलातील पाण्याचे स्त्रोत आटून पाणी नाहीसे होणार. अशात वन्यप्राणी पाण्याच्या शोधात जंगलालगतच्या गावात शिरतात. यातूनच मानव गावातील प्राण्यांवरील हल्ल्यांना सुरुवात होते. या वन्यप्राण्यांना जंगलातच पाण्याची सोय झाल्यास त्यांचा गावातील शिरकाव होणार नाही व अप्रिय घटना घडणार नाहीत. यामुळे वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन केशोरी आणि गोठणगाव जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची संख्या वाढवून प्राण्यांचा गावाकडे होणारा वावर थांबविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.