तावशी खुर्द येथे स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 09:30 PM2018-08-30T21:30:47+5:302018-08-30T21:31:09+5:30
येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम तावशी खुर्द येथील रहिवाशांनी स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली असून तसे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : येथून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम तावशी खुर्द येथील रहिवाशांनी स्वतंत्र ग्रामपंचायतची मागणी केली असून तसे निवेदन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविले आहे.
तावशी खुर्द हे गाव अर्जुनी मोरगावपासून अर्धा कि.मी. अंतरावर आहे. मात्र ते सध्या पाच कि.मी. अंतरावरील महालगाव ग्रामपंचायतीत समाविष्ट आहे. येथील रहिवाशांचा दैनंदिन अर्जुनी-मोरगावशी संपर्क येतो. महालगाव हे विरुद्ध दिशेला आहे. महालगाव येथे ये-जा करण्यासाठी थेट व कच्चा मार्ग सुद्धा नाही. विविध कामजासाठी विद्यार्थी व वृद्धांना हालअपेष्टा करीत ग्रामपंचायत कार्यालयात जावे लागते. गेल्या ५० वर्षापासून हे गाव महालगाव ग्रा.पं.मध्ये समाविष्ट झाले तेव्हापासून ते तसेच आहे.
नव्याने पुनर्रचना झालीच नाही. शिवाय कसल्याही सुधारणा झाल्या नाहीत. यासाठी २५३ गावकºयांनी स्वतंत्र ग्रामपंचायतच्या मागणीसाठी वरिष्ठांना निवेदन दिले आहे. हे गाव अर्जुनी-मोरगाव नगर पंचायतशी का जोडण्यात आले नाही हे न उलगडणारे कोडे आहे.
शासनाने स्वतंत्र ग्रा.पं. निर्मितीचा प्रश्न सोडवावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच दिलीप शहारे, संजय बडोले, खेमराज लाडे, यशोधरा शहारे, दर्शना शहारे, सुषमा पुराम व गावकºयांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.