घरगुती नळांना मीटर लावण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:34 AM2021-07-14T04:34:04+5:302021-07-14T04:34:04+5:30
केशोरी येथे ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याची पायपीट थांबली असली तरी घरगुती ...
केशोरी येथे ग्रामपंचायतीकडून नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दूरवरून पिण्याचे पाणी आणण्याची पायपीट थांबली असली तरी घरगुती नळ सोडण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे दिवसभरात कोणत्याही वेळेत नळ सोडले जात असल्यामुळे महिलांची फारच गैरसोय होत आहे. केव्हाही पाणी सोडत असल्यामुळे नळाद्वारे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. गावातील बऱ्याच नळांना तोट्या लावल्या नाही. पिण्याचे पाणी सोडण्याची वेळ निश्चित असली तर त्याच वेळेत महिलांनी पाणी भरण्याचे कार्य केले असते. परिणामी, महिलांना नळ येण्याची वाट पाहावी लागते. अनेक दिवसांपासून नळांना मीटर लावण्याची मागणी होत आहे; परंतु या मागणीकडे ग्रामपंचायत हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. नळांना मीटर योजना कर्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीने ग्राहकांकडून आधार कार्डची मागणी केली होती. मात्र अद्यापही मीटर लावण्यासंबंधी कोणती ही कारवाही करण्यात आली नाही. कधी-कधी तर रात्रंदिवस नळ सुरू राहत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. घरगुती नळांना मीटर लावल्यास ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात भर पडल्याशिवाय राहणार नाही. याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन घरगुती नळाला मीटर लावण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी महिलांनी केली आहे.