गोरेगावच्या शेवाळाला राष्ट्रीयस्तरावर मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 12:50 AM2019-02-10T00:50:42+5:302019-02-10T00:52:19+5:30
गोंदिया हा तलावाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख असतांना या जिल्ह्यातील तलाव बोडीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा कधीही अभ्यास झाला नाही. नागपूरहून आलेल्या तज्ञांनी येथील चंभार बोडी (तलाव) चा अभ्यास केल्यानंतर जे वास्तव पुढे आले ते कुतुहलाचा विषय ठरत आहे.
दिलीप चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोरेगाव : गोंदिया हा तलावाचा जिल्हा अशी सर्वदूर ओळख असतांना या जिल्ह्यातील तलाव बोडीतील नैसर्गिक साधन संपत्तीचा कधीही अभ्यास झाला नाही. नागपूरहून आलेल्या तज्ञांनी येथील चंभार बोडी (तलाव) चा अभ्यास केल्यानंतर जे वास्तव पुढे आले ते कुतुहलाचा विषय ठरत आहे. चंभार बोडीतील शेवाळची देशातच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावर असल्याची बाब पुढे आली आहे.
प्राप्त माहितीनुसार गोरेगाव शहराच्या मध्यभागी चंभार बोडी (तलाव) अनेक वर्षांपासून आहे. या तलावातील पाणी हिरव्या रंगाचे आहे. त्या पाण्यातील शेवाळाची लाखाच्या घरात मागणी आहे. या शेवाळापासून लहान मुलांसाठी प्रोटीनयुक्त पदार्थ, जिम पावडर, फुड स्पेशलिस्ट असे पदार्थ जे शरीरष्ठीला फायद्याचे आहे. ते सर्व या चंभार बोडीतील शेवाळपासून बनतात असे बोडीची पाहणीसाठी आलेल्या तज्ञाचे म्हणणे आहे. चंभार बोडीत नैसर्गिकरित्या हे महाग शेवाळ उपलब्ध होत असल्यामुळे स्थानिक नगर पंचायतीला याचा मोठा आर्थिक लाभ होणार आहे. सदर शेवाळ सहजासहजी तयार होत नाही तर त्यासाठी तशी प्रक्रिया बऱ्याच जागी करावी लागते. कृत्रिमरित्या शेवाळ तयार केले जाते. नंतर ते बाजारात प्रोट्रीन म्हणून विकले जाते. दहा ग्राम शेवाळच्या पावडरची मागणी बाजारात एक हजार रुपये आहे. ७ फेब्रुवारीला नागपूरहून आलेल्या बायोकेअर कंपनीच्या टिमने गोरेगाव येथील चंभार बोडीची पाहणी केली. त्यांनी बोडीत नाव फिरवून पाण्याचे निरीक्षण केले. बोडीतील पाच जागेवर मायक्रो आॅरगानिझम टाकले. यामुळे दूषित बोडीतील पाणी शुध्द होणार आहे. घरातील सांडपाणी बोडीत येत असल्यामुळे पाणी दूषित झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी नगरपंचायतचे नगराध्यक्ष आशिष बारेवार यांनी चंभार बोडीच्या शुध्दीकरणाचा प्रस्ताव लवकरच प्रस्तावित करणार असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले.
दूषित पाण्यामुळे माशांना धोका
चंभार बोडीत आजघडीला विविध जातीची सात ते आठ हजार मासे आहेत. पण या माशांना दूषित पाण्यामुळे आॅक्सिजन व सूर्यप्रकाश मिळत नाही. अनेक मासे दरवर्षी मरत असल्याचे चित्र आहे. या बोडीत राहु, कतला, सिपनस अशी महागड्या मासे आहेत. या बोडीतील हिरवे पाणी माशांसाठी धोकादायक ठरत आहे.
कसे तयार होते प्रोटीन?
शेवाळपासून प्रोटीन तयार करण्यासाठी प्रथम जाळीतून शेवाळ काढावे लागते.या शेवाळपासून उच्च दर्जाचे प्रोटीन निघाल्यावर ते सोलर कुकरमध्ये टाकून पावडर काढले जाईल. त्यानंतर प्रोसेसिंग करुन त्याची विक्री केली जाते. सदर प्रोटीनची विदेशात मोठी मागणी आहे.
विविध कराच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाशिवाय नगरपंचायतला दुसरे उत्पन्न नाही. शेवाळचे पावडर बनवून त्यांची विक्री केल्यास नगर परिषदेला उत्पन्न मिळेल.
- हर्षीला राणे, मुख्याधिकारी न.प.गोरेगाव
गोंदिया जिल्ह्यात बरीच साधन सामग्री आहे. त्याविषयी अभ्यास होणे गरजेचे आहे. चंभार बोडीतील शेवाळमुळे गोरेगाव न.प.ला उत्पन्न मिळणार आहे. येथील नागरिकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण होतील.अजुनही जिल्ह्यात असे बरेच तलाव असू शकतात त्यांची खातरजमा झाली पाहिजे.
-आशिष बारेवार, नगराध्यक्ष, नगरपंचायत गोरेगाव.