शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी
By admin | Published: January 22, 2017 12:54 AM2017-01-22T00:54:26+5:302017-01-22T00:54:26+5:30
महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीची दखल घेत यशवंत पंचायत समिती गोरेगावच्या शिक्षण
गोंदिया : महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या मागणीची दखल घेत यशवंत पंचायत समिती गोरेगावच्या शिक्षण विभागाने १७ जानेवारीला २०१७ ला तालुका तक्रार निवारण सभेचे आयोजन केले होते. त्या अनुषंगाने पुरोगामी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे व जिल्हा नेते रघुपती अगडे यांच्या नेतृत्वात पं.स.सभापती दिलीप चौधरी, उपसभापती सुरेंद्र बिसेन, खंडविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गटशिक्षणाधिकारी यशवंत कावळे, विस्तार अधिकारी मालाधारी यांना निवेदन देऊन शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
प्रमुख मागण्यांमध्ये सर्व सेवापुस्तिका अध्यावत करुन दुय्यम प्रत पुरविणे, प्रसूती रजा, अर्जीत रजा व वैद्यकीय रजा प्रकरणे त्वरित निकाली लावणे, चटोपाध्याय निवड वेतनश्रेणी प्रस्ताव जिल्हा परिषदेला त्वरित पाठविणे, जीपीएफ/डीसीपीएस सेडूलसह चालान सन २००८-०९ जिल्हा परिषदेला पाठविणे, कायमतेचा लाभ संगणक सूट, हिंदी मराठी सूट व पुर्वपरवानगी प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविणे, शालेय पोषण आहार, धान्य पुरवठा त्वरित करणे, केंद्रप्रमुख पदाचा कार्यभार सेवाजेष्ठता पदवीधर शिक्षकाला देणे, गणवेषाची अधिकची रक्कम शाळांना त्वरित देणे, अपंग भत्ता, प्रवास भत्ता कपात प्रश्न त्वरित निकाली लावणे या मागण्यांचा समावेश होता. चर्चेअंती सभापती व खंडविकास अधिकारी यांनी समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन २० जानेवारीपर्यंत समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
समस्या न सुटल्यास धरणे व मोर्च्याचे आयोजन करण्याचा इशारा जिल्हा सरचिटणीस हरिराम येळणे यांनी दिला आहे. तक्रार निवारण सभेच्या निमित्ताने शिक्षण विभागाचे कोल्हे, हिरापुरे, भेंडारकर, कक्ष अधिकार पी.जी. शहारे, व वित्त विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात तालुकाध्यक्ष मानीक शरणागत, सचिव विजय नेवारे, मार्गदर्शक एल.एफ. गिऱ्हेपुंजे, एन.सी. बिजेवार, पी.के. खोब्रागडे, राजेश लदरे, संघटक दिनेश अंबादे, संजय साखरे, जगणे, शरद सोरते, सेवकराम चौरागडे, राजू चौरागडे, आर.एम. बारेवार, महिलाध्यक्ष संगीता घासले, सचिव उनिता पारधी, तालुका नेते गौरी रायकवार, संघटक बुरडे, पटले, वऱ्हाडे, हरिणखेडे उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)