डोंगरगड-बल्लारशाह मार्गावर रेल्वेगाडीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:46 PM2018-10-11T22:46:11+5:302018-10-11T22:46:30+5:30
गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : गोंदिया-चंद्रपूर व गोंदिया-डोंगरगढ रेल्वेमार्ग परिसरातील गोरगरीब आणि सर्वसाधारण प्रवाशांसाठी मोठा आधार आहे. मात्र दुपारपाळीत या मार्गावर रेल्वेगाडीची सोय नसल्याने या भागातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नवरात्री उत्सवात वाढणारी प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशसनाने गोंदिया-चंद्रपूर (बल्लारशाह) व गोंदिया डोंगरगढ मार्गावर अतिरिक्त रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गोंदिया-चंद्रपूर मार्गावर चंद्रपूर येथे प्रसिद्ध महाकाली मंदिर आहे. गोंदिया-डोंगरगढ मार्गावर डोंगरगढ येथे प्रसिद्ध बम्लेश्वरी मातेचे देवस्थान आहे.
या दोन्ही ठिकाणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी जातात. त्यांच्यासाठी नवरात्री उत्सवादरम्यान चंद्रपूर, डोंगरगढ व डोंगरगढ-चंद्रपूर (बल्लारशाह) रेल्वेगाडी चालविण्यात यावी.
जेणेकरुन महाराष्टÑ, मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील लाखो भाविकांंना दर्शनाचा लाभ घेण्याची सोय उपलब्ध होईल, अशी रेल्वे प्रवाशांची अपेक्षा आहे. गोंदिया हे जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. आठही तालुक्यात गोंदिया हे मध्यभागी असल्याने विविध कामासाठी जिल्हावासीयांना गोंदियाला यावे लागते.
काम आटोपल्यावर मात्र गावाला जाण्यासाठी दुपार पाळीत रेल्वेगाडी नसल्याने गोरेगाव, सडक अर्जुनी, सौंदड, पांढरी, नवेगावबांध, अर्जुनी-मोरगाव, वडेगाव, अरुणनगर, वडसा येथील नागरिक व विद्यार्थ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हीच अवस्था गोंदिया-दरेकसा परिसरातील नागरिकांची आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने डोंगरगढ व बल्लारशाह मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरु करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी रेल्वे विभागाकडे केली आहे.
नक्षलग्रस्त भागातील नागरिकांची गैरसोय
बाहेर गावावरुन सकाळी गोंदियाला आलेल्या नागरिकांना दुपारच्या पाळीत गाडीच नसल्यामुळे सायंकाळी शिवाय स्वत:च्या गावाला परत जाता येत नाही. या मार्गावर दळण-वळणाची साधने नसल्याने दरेकसा, जमाकुडो, विचारपूर, चांदसुरज या नक्षलग्रस्त भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. या दोन्ही मार्गावर दुपार पाळीत लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने गोंदियाला आलेल्या नागरिकांना सायंकाळच्या गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागते. रेल्वे प्रवाशांच्या उदासीनतेमुळे गोंदिया-डोंगरगढ व गोंदिया-वडसा दरम्यान लोकल गाडीची व्यवस्था नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच वेळेचा अपव्यय ही होत आहे.