शौचास गेलेल्या महिलेला लैंगिक सुखाची मागणी; आरोपीला २ वर्षे कारावास
By नरेश रहिले | Published: March 16, 2024 05:52 PM2024-03-16T17:52:01+5:302024-03-16T17:52:39+5:30
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल : पाच साक्षीदारांची न्यायालयात तपासणी
गोंदिया : तालुक्यातील ग्राम किन्ही येथील महिला शौचासाठी गावातील जंगल झुडपात गेली असताना तिला शरीर सुखाची मागणी करणाऱ्या आरोपीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्षांचा सश्रम कारावास व चार हजार रुपये दंड ठोठावला आहे. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी शनिवारी (दि. १६) केली आहे. नितीन देवराज पुरी मुलतानी (२५, रा. किन्ही, ता. गोंदिया) असे आरोपीचे नाव आहे.
२१ ऑक्टोबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास किन्ही येथील महिला गावाच्या बाहेर झुडपी जंगलात शौचास बसली होती. आरोपी नितीन मुलतानी हा तिच्या मागे-मागे सायकलने गेला व तिला शारीरिक सुखाची मागणी केली. तिने नकार देत ही गोष्ट घरच्या लोकांना सांगण्याची धमकी दिली त्यामुळे पुढील अनर्थ टळला. फिर्यादीने २१ ऑक्टोबर २०१७ रोजी रावणवाडी पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी केला होता. या प्रकरणात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सहायक सरकारी अभियोक्ता वसंत चुटे यांनी ५ साक्षीदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली. आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा पुरावा व सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी नितीन मुलतानी याला शिक्षा सुनावली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहिरकर यांच्या देखरेखीत पोलिस शिपाई यादोराव कुर्वे यांनी काम बघितले.
अशी सुनावली शिक्षा
- भादंवि कलम ३५४(अ) अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावास. कलम ३५४ (क) अंतर्गत २ वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त कारावास अशाप्रकारे २ वर्षांचा सश्रम कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.