शहरातील जीर्ण इमारती पाडून टाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:20 AM2021-06-29T04:20:21+5:302021-06-29T04:20:21+5:30
गोंदिया : नगर परिषदेने शहरातील जुन्या झालेल्या जीर्ण इमारती पडून त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी अशा जीर्ण इमारत मालकांना ...
गोंदिया : नगर परिषदेने शहरातील जुन्या झालेल्या जीर्ण इमारती पडून त्यामुळे जीवितहानी होऊ नये यासाठी अशा जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावून जीर्ण इमारत पाडण्याबाबत कळविले होते. मात्र त्यांनतरही त्याला घेऊन कित्येकांकडून काहीच प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. अशात नगर परिषदेने आता अशा इमारत मालकांना दुसऱ्यांदा नोटीस बजावले असून यानंतर मात्र थेट कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेतच दिले आहेत.
कित्येक वर्षांचे जुने बांधकाम असलेल्या इमारतींना पावसाळ्यात सर्वाधिक धोका असतो. पावसाळ्यात अशा इमारती पडून कित्येकांचा जीव गेल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. अशात पावसाळा बघता नगर परिषदेच्या नगर रचना विभागाने अशा जीर्ण इमारतींपासून जीवित व वित्तहानी घडू नये यासाठी शहरातील जीर्ण इमारतींचे सर्वेक्षण करवून घेत जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावले होते. नोटिसीनुसार त्यांना अशा जीर्ण इमारत किंवा त्यांचा धोकादायक स्थितीत आलेला भाग पाडून घेण्यास सांगितले होते. जेणेकरून इमारतीत राहणाऱ्यांना किंवा रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना त्यापासून धोका होणार नाही. मात्र नोटीस दिल्यानंतरही कित्येकांनी त्यावर काहीच कारवाई केली नाही.
आतापर्यंत पावसाने आपले रूप दाखविले नाही. मात्र येत्या काळात पाऊस बरसणार व तेव्हा अशा इमारतींपासून धोका होऊ नये म्हणून नगर रचना विभागाने आता अशा जीर्ण इमारत मालकांना दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नगर पालिका अधिनियम १९९६ कलम १९५ व २१९ नुसार हे नोटीस बजावण्यात आले असून यानंतर आता मात्र कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
---------------------------------
सर्वेक्षणात १२३ इमारतींची नोंद
नगर परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १२३ जीर्ण इमारतींची नोंद घेण्यात आली असून त्यांना नगर रचना विभागाने नोटीस बजावले आहे. आता दुसऱ्यांदा त्यांना नोटीस बजावण्याचे काम सुरू असून सोबतच सर्वेक्षणानुसार आणखी नोटीस पाठविले जात आहेत. या इमारत मालकांना आता यापुढे नोटीस न देता थेट केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांनी कळविले आहे.