नगरसेवकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 12:15 AM2018-04-11T00:15:39+5:302018-04-11T00:15:39+5:30

मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे.

Demolition Movement of Corporators | नगरसेवकांचे धरणे आंदोलन

नगरसेवकांचे धरणे आंदोलन

Next
ठळक मुद्देवर्षभरापासून मागणी प्रलंबित : नगर परिषदेचा गलथान कारभार उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : मागील वर्षी निवेदन देऊनही प्रभागातील समस्या मार्गी न लागल्याने शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक सुनील तिवारी यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षासमोरच मंगळवारी (दि.१०) धरणे आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक असलेले तिवारी यांच्यासोबत पक्षातील अन्य नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले. दरम्यान नगरसेवकाला समस्या मार्गी लागत नसल्याचे धरणे आंदोलन करावे लागत असेल तर शहरातील नागरिकांचे काय? असा सवाल देखील यामुळे उपस्थित केला जात आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक २० चे नगरसेवक असलेले तिवारी यांनी प्रभागातील पाणी टंचाईची समस्या लक्षात घेत तीन नवीन पाणी टाक्या, एक बोअरवेल व एक टाकी दुरूस्त करून देण्याची मागणी केली होती. यासाठी त्यांनी १५ मार्च २०१७ रोजी म्हणजेच मागील वर्षी नगराध्यक्षांना निवेदन दिले होते. नगराध्यक्ष अशोक इंगळे व मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत आठ दिवसांत मागण्यांची पूर्तता करणार असे आश्वासनही दिले होते असे तिवारी यांनी सांगीतले. मात्र आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी लोटूनही तिवारी यांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही. यंदा शहरात पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यामुळे प्रभागातील नागरिकांना याची झळ बसू नये, यासाठी तिवारी यांनी कुणालाही विनवणी करण्यापेक्षा मंगळवारी (दि.१०) थेट मुख्याधिकारी पाटील व नगराध्यक्ष इंगळे यांच्या कक्षासमोर धरणे आंदोलन सुरू केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत कॉंग्रेस पक्षाचे गट नेता व सभापती शकील मंसुरी, कॉंग्रेस कमिटी शहर अध्यक्ष अशोक चौधरी, नगरसेवक भागवत मेश्राम, देवा रूसे, आलोक मोहंती, संदीप रहांगडाले, हरीश तुळसकर, रोहन रंगारी, निकेतन अंबादे, हिमांशू सोनकुसरे, गौरव चन्नेकर, शुभम सहारे, निक्की येडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
पालिकेच्या अकार्यक्षम कारभाराची प्रचिती
मागील वर्षी करण्यात आलेल्या मागण्यांची पूर्तता होत नाही. विशेष म्हणजे, आता नगरसेवकांच्याच मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नगरसेवकांना धरणे द्यावे लागत आहे. त्यामुळे या प्रकारातून पालिकेचा कारभार किती सुरळीत सुरू आहे अशी प्रतिक्रीया नगर परिषद वर्तुळात उमटू लागल्या आहे. नगरसेवकांनाच आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची पाळी आली असताना सर्वसामान्यांच्या समस्यांचे काय असा सवालही उपस्थित केला जात आहे.
नगराध्यक्षांकडून मनधरणीचा प्रयत्न
तिवारी धरणे देऊन बसले असतानाच नगराध्यक्ष इंगळे कार्यालयात आले. हा प्रकार बघून त्यांनी तिवारी व उपस्थित अन्य सदस्य व कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कक्षात या चर्चा करू असे म्हणत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र वर्षभरापासून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने चांगलेच रागावलेले तिवारी यांनी कक्षात जाण्याचे टाळले. जोपर्यंत मागण्याची पूर्तता होत नाही तोपर्यंत धरणे सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.

Web Title: Demolition Movement of Corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.