समाजजीवनातील प्रदर्शन, नृत्याविष्काराची धमाल
By admin | Published: January 15, 2017 12:15 AM2017-01-15T00:15:51+5:302017-01-15T00:15:51+5:30
भारतीय युवाशक्ती अधिक समंजस होत असल्याचे प्रतिबिंब बोंडगावदेवी येथे आयोजित राष्ट्रीय
राज्यस्तरीय रासेयो शिबिर : बोंडगावदेवीत विविध जिल्ह्यातील तरुणाईचा अविष्कार
संतोष बुकावन अर्जुनी मोरगाव
भारतीय युवाशक्ती अधिक समंजस होत असल्याचे प्रतिबिंब बोंडगावदेवी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय शिबिरात उमटले. या शिबिरात युवक-युवतींनी समाजजीवनातील प्रदर्शनापासून ते समाज पोखरणाऱ्या स्त्री भ्रूणहत्येसारखे विषय हाताळत समाजाला ‘जागे’ करण्याचा जोरकस प्रयत्न केला.
तरुणाईचा प्रचंड जल्लोष...मस्ती... पावित्र्य अन् नृत्याच्या धमाल अविष्काराने बोंडगावदेवीवासीयांना त्यांनी मंत्रमुग्ध केले. दिवसा श्रमदानामुळे आलेला शिण रात्रीच्या जल्लोषपूर्ण मनोरंजनात कुठेच दिसत नव्हता. मॉ गंगा-जमुना देवस्थानाच्या नावाने प्रसिद्ध असलेला बोंडगावदेवीचा परिसर श्रमदानासोबतच गीत, संगीत, नृत्य आणि आदिमायेच्या गजराने उत्साह आणि पावित्र्याने न्हाऊन निघाला.
राष्ट्रप्रेमाचे स्फुलिंग पेटलेल्या आणि मराठीपणाचा बाणा जपलेल्या, सळसळत्या तरुणाईच्या शिस्तबद्ध जल्लोषात या शिबिराला ९ जानेवारी रोजी सुरुवात झाली. श्रमदान तर होतच आहे, मात्र सांस्कृतिक वारसा जपून समाजाला त्या माध्यमातून संदेश देण्याचा भरकस प्रयत्न ही तरुणाई करत आहे. एकापेक्षा एक सरस लोकप्रिय हिंदी, मराठी गीतांचे सादरीकरण करुन मुंबईपासून आलेल्या या तरुणाईने उपस्थितांची मने जिंकली.
भावी युवापिढीवर देशाची धुरा असताना हे आवाहन पेलण्याऐवजी आजची युवापिढी व्यसनाधिनतेकडे आकृष्ट होत आहे. भरकटत चाललेल्या या युवापिढीला वेळीच व जागरुक होण्याचा संदेश मुंबईच्या अंकिता जाधव व चमूने व्यसनमुक्ती नाटीकेतून दिला. कुष्ठरोगाबद्दलच्या अनेक गैरसमजूती समाजात आहेत. कुष्ठरोग्यांकडे पाहण्याचा दृष्टीकोन या वैज्ञानिक युगात बदलला पाहिजे असा संदेश शिबिरार्थ्यांनी दिला. ‘इंद्रदरबारच्या मिसकॉल’ने तर धमालच उडविली. मार्डन नारद व वरुणदेवाची हुबेहुब भूमिका लाखांदूरच्या प्रशांत नेवारे व संचाने साकारली. दिवसेंदिवस पृथ्वीतलावर पाण्याची समस्या भेडसावत आहे. प्रदूषण वाढले आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. प्रदूषणाविरोधात लढा देऊन पर्यावरण व सृष्टी वाचविण्यासाठी लढा देण्याचे आवाहन केले.
निकिता रंगारी या विद्यार्थीनीने गायलेल्या ‘मेरे ढोलना सून....प्यार की धून’ या ठेकेबाज गाण््याने या राज्यस्तरीय शिबिराच्या शामियान्यात अख्खी तरुणाई बेभान होऊन थिरकली. या बहारदार गाण्यावर युवक-युवतींचा जोश बघण्यासारखा होता. या शिबिरात गीत गायनामध्ये अनेक गीतांची अमीट छाप राहिली. सोबतच भजन, कव्वाली, लावणी, एकलनृत्य, समूहनृत्य, गीतगायनाच्या बहारदार आविष्काराने अख्खा शामियाना भावविभोर झाला.
भिवापूरच्या गोपाल पाटीलने सादर केलेले ‘मै कभी अंधेरे मी गीत जाऊ, मुंबईच्या अंकिता जाधवने सादर केलेल्या लावणीवर शामीयानात उपस्थित असलेल्यांना ताल धरावयास भााग पाडले. किरण बोरकरने सादर केलेल्या बाप्पा मोऱ्या या नृत्यावर अगदी धार्मिक वातावरण निर्मिती झाली. सतीश जिभकाटे, केजू चांदेकर, लोचन मेंढे, रेश्मा भाजीपाले, प्रशांत पटले, रोशन शेंडे, धर्मेश सूर्यवंशी, सुहासिनी वैद्य, सुचिता वाडेकर, तेजस्विनी जाधव, कलावती चुटे, ज्योती बोरकर, दीपीका ब्राम्हणकर, तुलसीदास राखडे, तेजस्विनी दुपारे, सारिका विश्वास, निकीता रंगारी, ज्योती भाटी, सागर निमजे, सरिता हातझाडे, कृष्णकुमार भोयर, रजन महाजन, तुषार नाकाडे, मोनिका मडावी यांच्या अभिनय प्रस्तुतीकरणाने सर्वांची वाहवा मिळविली.