देवरी तालुक्यात पाय पसरतोय डेंग्यू व टायफाॅइड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:33 AM2021-09-06T04:33:06+5:302021-09-06T04:33:06+5:30
लोहारा : तालुक्यात अनेक ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून यातील काही जणांना डेंग्यू झाल्याचे ...
लोहारा : तालुक्यात अनेक ठिकाणी डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून यातील काही जणांना डेंग्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या महिन्यापासून अनेक जण सर्दी, ताप व खोकल्याने त्रस्त आहेत. देवरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढली आहे. देवरी तसेच चिचगड, पालादूर, वांढरा, अंभोरा, वडेगाव, मुल्ला, लोहारा, पुराडा, सावली, डोगरगाव, शिरपूर-बांध या परिसरातील नागरिक विविध प्रकारच्या आजारांमुळे त्रस्त झाले आहेत. बदलत्या हवामानामुळे पावसाचा मुक्काम लांबत असल्याने डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे.
जुलै व ऑगस्ट पाठोपाठ सप्टेंबरमध्येही डेंग्यूचा उद्रेक कायम असून, रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. डेंग्यूबाधित संशयितांचा आकडा वाढला असून डेंग्यू आणि व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी व सरकारी रुग्णालये फुल झाली आहेत. शहरात डेंग्यू, मलेरिया आणि व्हायरल फिवरची साथ सुरू आहे. त्यामुळे डेंग्यू, टायफाॅइड, थंडी-तापाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
औषध फवारणी यंत्र उपलब्ध असूनही कोणत्याही प्रकारची भूमिका व उपाययोजना केल्या जात नाहीत. डासांची संख्या खूप वाढली यामुळे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आजारी पडले असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे देवरी तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे.