मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला, सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण

By कपिल केकत | Published: October 7, 2023 01:43 PM2023-10-07T13:43:35+5:302023-10-07T13:43:47+5:30

सुदैवाने डेंग्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू नाही

Dengue overtakes malaria, 71 cases found in gondia district in September | मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला, सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण

मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावला, सप्टेंबर महिन्यात ७१ रुग्ण

googlenewsNext

कपिल केकत

गोंदिया : जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण आढळून आले व त्यातच दोघांचा जीव गेल्याने मलेरियापासून जास्त धोका दिसून येत होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, मलेरियापेक्षा डेंग्यू फोफावताना दिसत आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात जेथे मलेरियाचे रुग्ण जास्त होते, तेथेच सप्टेंबर महिन्यात मात्र डेंग्यूने पाय पसरले असून, ७१ रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने जिल्ह्यात आतापर्यंत डेंग्यूमुळे एकाही मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही.

पावसाळ्यात प्रामुख्याने आजारांचे प्रमाण वाढते. यामध्ये जलजन्य आजार असो की, तापाच्या साोसोबतच डासजन्य आजारांचे प्रमाण जरा जास्तच असते. यंदा तर आजारांनी एकामागून एक रांगच लावली आहे. डोळे येण्यापासून याची सुरुवात झाली असून, त्यानंतर मलेरिया रुग्ण वाढले होते. हे सुरू असतानाच ताप व टायफॉइडची साथ जिल्ह्यात अद्याप सुरूच आहे, तर त्यातच आता डेंग्यूने टेन्शन वाढविले आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत जिल्ह्यात मलेरियाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून आले असून, यामुळे दोघांचा जीव गेल्याचीही नोंद आहे. यामुळे सुरुवातीला डेंग्यूपासून धोका दिसून येत नव्हता.

मात्र, मलेरियासोबतच डेंग्यूचे रुग्ण वाढू लागले असतानाच सप्टेंबर महिन्यात मलेरियाला मागे टाकून डेंग्यू पुढे निघून गेला आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात मलेरियाचे फक्त २३ रुग्ण आढळून आले असतानाच डेंग्यूचे तब्बल ७१ रुग्ण आढळून आले आहेत. यावरून आता मलेरियाला मागे टाकून डेंग्यू फोफावताना दिसत आहे. मलेरिया व डेंग्यूची ही आकडेवारी बघता जिल्ह्यात डासांचा किती मोठ्या प्रमाणात उद्रेक सुरू आहे याची प्रचीती येते, तर सोबतच यावर जिल्हा प्रशासन तोडगा काढण्यात हतबल आहे, याचीही प्रचीती येते.

गोंदिया तालुक्यालाच ग्रहण

- आतापर्यंत डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण गोंदिया शहर व तालुक्यातच आढळून आले आहेत. यात जानेवारी ते ऑगस्ट या कालावधीत गोंदिया तालुक्यात २३, तर फक्त शहरात १० रुग्ण आढळून आले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात तालुक्यात १५ रुग्ण आढळून आले असून, शहरात ८ रुग्ण आढळून आले आहेत. अशा प्रकारे आतापर्यंत एकूण १५० रुग्ण डेंग्यूचे आढळून आले आहेत.

तापाची साथ त्यात डेंग्यूचे टेन्शन

- जिल्ह्यात सध्या ताप व त्यातच टायफॉइडची साथ पसरली आहे. घराघरांत ताप व टायफॉइडचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे अगोदरच जिल्हावासी चिंताग्रस्त आहेत. अशात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला असून, त्यामुळेच मलेरिया व डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येत वाढले आहेत. डेंग्यू आता जिल्हावासीयांसाठी टेन्शन बनला आहे.

जानेवारी ते ऑगस्ट रुग्णसंख्या

गोंदिया - २३

तिरोडा - ०२

आमगाव - ०९

गोरेगाव - ०९

देवरी - ०२

सडक-अर्जुनी - १३

सालेकसा - ०५

अर्जुनी-मोरगाव - ०६

गोंदिया शहर - १०

तिरोडा शहर - ००

एकूण - ७९

सप्टेंबर महिन्यातील रुग्णसंख्या

गोंदिया - १५

तिरोडा - ०६

आमगाव - ०४

गोरेगाव - १४

देवरी - ०३

सडक-अर्जुनी - ०६

सालेकसा - ०६

अर्जुनी-मोरगाव - ०८

गोंदिया शहर - ०८

तिरोडा शहर - ०१

एकूण - ७१

Web Title: Dengue overtakes malaria, 71 cases found in gondia district in September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.